first lady dcp for traffic branch in pune | Sarkarnama

पुण्याच्या ट्रॅफिकला शिस्तीची जबाबदारी पहिल्यांदाच महिला DCP कडे : त्यांनीही भरला होता पुण्यात दंड 

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पुणे : पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी पहिल्यांदाच आता महिला पोलिस उपायुक्तांकडे आली आहे. याआधी पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिलेल्या तेजस्वी सातपुते यांनी आज वाहतूक पोलिस उपायुक्त या पदाची सूत्रे घेतली. 

पुणे : पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी पहिल्यांदाच आता महिला पोलिस उपायुक्तांकडे आली आहे. याआधी पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिलेल्या तेजस्वी सातपुते यांनी आज वाहतूक पोलिस उपायुक्त या पदाची सूत्रे घेतली. 

या शाखेला पहिल्यांदाच पूर्णवेळ महिला पोलिस उपायुक्त मिळाल्या आहेत. अर्थात सातपुते यांच्या आतापर्यंतच्या सर्व नियुक्‍त्या या संबंधित पदावरील पहिल्या महिला अधिकारी अशाच होत्या. पुणे ग्रामीणच्या पहिल्या महिला अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सीआयडीच्या टेक्‍निकल विंगच्या प्रमुख, परतूरच्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त अधीक्षक पद हे अनुभवी अधिकाऱ्यांना दिले जाते. पण सातपुते यांनी कमी कालावधीत तेथे ठसा उमटविला. 

भारतीय पोलिस सेवेच्या 2012 च्या त्या अधिकारी आहेत. शेवगाव येथून शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बीएसस्सी (बायोटेक्‍नॉलॉजी) पदवीचे शिक्षण बारामतीतून पूर्ण केले. त्यांचे वकिलीचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांची पोलिस सेवेत निवड झाली. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण असो की चाकण येथे नुकतीच झालेली जाळपोळ अशा संवेदनशील ठिकाणी त्यांनी परिस्थिती र्धैर्याने हाताळली. 

पुण्याच्या वाहतूक नियंत्रणाच्या आव्हानांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की पुण्यातील पायाभूत क्षमता आणि प्रत्यक्षात वाहनांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे साहजिकच वाहतुकीवर त्याचा ताण येतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वच घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. पोलिस आयुक्तांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या करून दाखविण्याचे आव्हान आहे. ते सर्वांच्या मदतीने शक्‍य होईल. 

पुण्यात वाहन चालविताना या आधी कधी पोलिसांनी दंड घेतला आहे का, या प्रश्नावर त्या हसल्या आणि म्हणाल्या की दंड भरलेला आहे. ""मी आणि माझी बहीण स्कुटीवरून जात असताना लाल सिग्नल लागला. तो पर्यंत आम्ही झेब्रा क्रॉसिंगपाशी गेलेलो होतो. पोलिसाने दंड मागितल्यानंतर आम्ही तो भरला. तेव्हा मी सीआयडीमध्ये होते.'' 

पोलिसाने विनापावती तडजोडीची तयारी दाखविली नव्हती का, यावर त्या म्हणाल्या की नागरिकाने आधी तशी तयारी दाखवली तर काही पोलिस असे कृत्य करू शकतात. मात्र नागरिकांनीच अशी "ऑफर" दिली नाही आणि पावतीचा आग्रह धरला तर हे प्रमाण नक्कीच कमी होईल. मी तेव्हा नियमानुसार दंड भरला. पोलिसानेही मग जास्त विचारले नव्हते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख