मराठ्यांनो, लढणं हाच आपला धर्म !... पण...?

वादळ कधीही घोंघावत येऊ शकते. संकटे येऊ शकतात. संकटाशी सामना हा केलाच पाहिजे. जीवन हे जगण्यासाठी आहे. त्यामुळे आत्महत्या हे कुठल्याच प्रश्‍नाचे उत्तर असू शकत नाही. गरीब मराठ्यांची पोरं देशोधडीला लागत आहेत. वैफल्यग्रस्त आहेत. शेतीची माती झाल्याने जगण्यासाठी तो कुठेतरी आधार शोधतो आहे. हा आधार सरकारबरोबर याच समाजातील श्रीमंत आणि बड्या मराठ्यांनी त्यांना द्यायला हवा.
मराठ्यांनो, लढणं हाच आपला धर्म !... पण...?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या महत्त्वाच्या मुद्यासह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र पेटला आहे. लागलेली आग वझविण्याऐवजी ती अधिक कशी भडकेल याची काळजी काहींनी घेतली. आक्षेपार्ह विधाने करून मराठा समाजातील पोरांची टाळकी अधिक भडकविण्याचे राजकारण केले गेले. मराठा आंदोलनादरम्यान सर्वाधिक टीका झाली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. 

खरेतर मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार असतानाही हा समाज आक्रमक नव्हता असे नाही. तो होताच. मराठ्यांबरोबरच धनगरानाही आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर आजचे सत्ताधारी त्यावेळी दबाव आणत होते. त्यांना सळो की पळो करून सोडत होते. 

त्यावेळी हीच मंडळी कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करताना जी मुक्ताफळे उधळत होती ती आज आठवली तर आजच्या सत्ताधाऱ्यांचीही कीव करावीशी वाटते.आपण जे पेरतो ना तेच उगवते हे या मंडळींना माहीत नव्हते का ? एकेकाळी सत्तेवर असलेले आज विरोधी बाकावर बसले आहेत. आता ही मंडळी भाजप सरकारला जितके म्हणून अडचणीत आणता येईल तितके आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनाही तेच करीत आहे. ज्यांनी मूक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिणवले त्यांनाही आज पुळका आला आहे. 

मराठा समाज आणि त्यांचे प्रश्‍न हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. या समाजाच्या प्रश्‍नावर तज्ज्ञमंडळी अभ्यासही करीत आहेत. समाजाचे जे म्हणून काही प्रश्‍न आहेत ते ही काही एका रात्रीत निर्माण झालेले नाहीत. हे प्रश्‍न हळूहळू निर्माण झाले. एकेकाळी स्वत: उच्चवर्णीय आणि श्रेष्ठ समजणाऱ्या या समाजाने आपल्याला भविष्यात कधी तरी आरक्षणासाठी सरकारपुढे पदर पसरावा लागेल हे स्वप्नही पाहिले नसेल. " उत्तम शेती, मध्यम उद्योग आणि कनिष्ठ नोकरी' अशी सर्वसाधारण व्याख्या तीसचाळीस वर्षापूर्वी केली जात होती. पोरंग शिकलं काय किंवा नाही शिकलं काय ? आपल्याला काय फरक पडतो. जायचं असेल तर जा शाळेत नाही तर आहेच आपली शेती ! असे मोठ्या अभिमानाने शेतकऱ्याच्या घराघरांत सांगितले जायचे. आज त्याच शेतीचे काय झाले हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. 

मराठा समाजातील गरीब म्हणजेच अल्पभूधारक किंवा भूमिहिनांचे प्रश्‍न गंभीर आहेत. त्यांच्या शेतीला पाणी नाही. पत नाही. बॅंका, सोसायट्या त्यांना उभे करीत नाहीत. कर्ज हे पाचवीला पुजलेले. निसर्ग साथ देत नाही आणि सरकार जगू देत नाही. म्हणजेच अस्मानी, सुलतानी संकटे काही केल्या वर्षानुवर्षे पाठ सोडत नाही. मराठा समाजाविषयी समाजात गैरसमजही दिसून येतो. एअरकंडिशन आणि एैशआरामात जगणाऱ्या मंडळींना गरीब मराठ्यांची दु:ख कधीच कळली नाहीत. श्रीमंत, घरंदाज आणि शेकडो एकर जमीन असलेल्या आधुनिक राजेमहाराजांकडे पाहून मराठा समाजातील कष्टकरी, भूमिहीनांना त्यांच्या बरोबरीने तोलले जात असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असू शकते. 

मराठवाड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर तेथील चित्रही भयावह आहे. या विभागातील आठही जिल्हे आणि बुलडाणा, अकोला व वाशीम या जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता जास्त आहे. त्याचे कारण या भागातील मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. बहुंताश शेती कोरडवाहू आणि निसर्गाच्या भरवशावर चालणारी. पश्‍चिम महाराष्ट्रात सहकारी चळवळीने शेतकरी व ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला. 

मराठवाड्यात सहकारी साखर कारखाने सहकारी दूध संघ सहकारी सूतगिरण्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ग्रामीण भागातील मराठा समाजाचा मुख्य आधार शेती व सहकारच आहे. सहकाराची वाट लागली आहे. तर निसर्गाच्या लहरी कारभारातून जे काही पीक हाती येते त्याला गेले चार वर्षे केंद्र सरकारच्या ग्राहक केंद्रीय धोरणामुळे भावच मिळालेला नाही. औद्योगिककरणातून मिळणारा रोजगार औरंगाबाद वगळता अन्यत्र शून्य आहे. गरीब शेतकऱ्याला आपल्या मुलांना दहावी बारावीचे कोचिंग क्‍लासेसचे लाख दीड लाखाचे शुल्क परवडत नाही. जेथे पोटाची खळगी भरण्याची भ्रांत तेथे ही रक्कम आणायची कोठून ? 

जिल्हा परिषद शिक्षणाचा दर्जा सुमार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या भागात मराठा समाजात बेरोजगारांची फौज उभी राहत आहेत. हा बेरोजगार युवक अस्वस्थ आहे. अशांत आहे. आता आक्रमक झाला आहे. मराठा समाज म्हणजे गढी, वाडे आणि मोठे जमीनदार, कंत्राटदार, पुढारी हा जो समज आहे तो चुकीचा आहे. असा वर्ग मराठा समाजात दोन ते पाच टक्के इतकाच आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याच्याकडे पाहून उर्वरित 95 टक्के समाजावर अन्याय करणे चुकीचे ठरेल. 

आरक्षण किंवा सवलती मराठा समाजाला मिळायला हव्यात पण, श्रीमंत मराठे त्यापासून कसे दूर राहू शकतील याचाही गांभीर्याने विचार करायला हवा. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना श्रीमंत शेतकऱ्यांना बाजूला ठेवण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्यच आहे. उद्या जरी आरक्षण मिळाले तरी मराठा समाजाचे भविष्य उज्ज्वल आहे असे समजण्याचे काही कारण नाही. आरक्षणाचे निश्‍चितपणे फायदे होऊ शकतात. पण, कोैशल्य शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. कोणतेही काम हलके नाही. आपण ते शिकले पाहिजे. आपल्याला कला अवगत आहे. शेतीची माती झालीच आहे. पण, जर मला ड्रायव्हिंग येत असेल तर मी गाडी चालवूनही माझे कुटुंब चालवू शकतो हा विश्‍वास त्याच्या मनात आला पाहिजे. 

शहरामध्ये कागद जरी विकला तरी पैसे मिळतात. पुणे, मुंबई घ्या किंवा कोणतेही मोठे शहर पहा. तेथे राजस्थानी, उत्तरप्रदेश, बिहारची मंडळी मोठ्या संख्येने दिसतात. ते वेल्ड, इलेक्‍टीशन, सुतार, गवंडी, फरशी, फर्निचर, सलून आदी कोणतेही कामे करतात. शेकडो मैलांवरून आलेली ही मंडळी कोट्यधीश का होतात हे कोणी उघड्या डोळ्यांनी पाहत नाहीत ? सांगली असो की नाशिक. द्राक्ष शेती कंत्राटी पद्धतीने घेणारे उत्तरप्रदेशी लोक दिसतात. बेदाणे वॉशिंगचे कामेही तेच करतात आणि मराठी माणसापेक्षा अधिक पैसे कमवितात. या सर्व गोष्टी मराठा समाजाने लक्षात घेणे गरजे आहे. हो, आरक्षण मिळाले तरी ! 

वादळ कधीही घोंघावत येऊ शकते. संकटे येऊ शकतात. वादळातही डगमगून जाता कामा नये. संकटाशी सामना हा केलाच पाहिजे. जीवन हे जगण्यासाठी आहे. त्यामुळे आत्महत्या हे कुठल्याच प्रश्‍नाचे उत्तर असू शकत नाही. कधी नव्हे ते मराठा समाज संकटात सापडला आहे. गरीब मराठ्यांची पोरं देशोधडीला लागत आहेत. वैफल्यग्रस्त आहेत. शेतीची माती झाली आहे. त्यामुळे जगण्यासाठी तो कुठेतरी आधार शोधतो आहे. हा आधार सरकारबरोबर याच समाजातील श्रीमंत आणि बड्या मराठ्यांनी त्यांना द्यायला हवा. 

केवळ कोरडे उपदेश देऊन काही साध्य होणार नाही. मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी जसे पुढे जाता तसे या समाजासाठी मी स्वत: योगदान देईन. आत्महत्या केलेल्या चार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो असे कोणी नेता का म्हणत नाही ? जे रयत संस्था, जैन समाज करतो ते श्रीमंत मराठ्यांना का शक्‍य नाही. सगळ्या गोष्टी सरकारवर का ढकलल्या जात आहे. 

सहकार चळवळीने एकेकाळी गावगाड्याला आधार दिला मात्र सहकारही स्वाहाकार झाला. सहकारी कारखान्यांऐवजी मालकीचे कारखाने काढण्याकडेच चढाओढ सुरू आहे. त्यामुळे श्रीमंत मराठे अधिक श्रीमंत होत गेले आणि गरीब मराठे अधिक गरीब राहत गेले. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे याविषयी दुमत असण्याचे मुळीच कारण नाही. पण, आपणही बदलाला सामोरे गेले पाहिजे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com