Fearlessness and inclusive politics is taught by late Munde : Pankaja Munde | Sarkarnama

बेरजेचं राजकारण आणि निर्भीडपणा मुंडे साहेबांनी शिकविला : पंकजा मुंडे

दत्ता देशमुख
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

बीड जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींसह, पदाधिकारी व बुथ विस्तारकांची बैठक शुक्रवारी औरंगाबादेत पार पडली. ताकदीने काम करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. 
 

बीड : " दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंवर कार्यकर्त्यांनी केलेले भरभरून प्रेम कदापी विसरणार नाही. आजही जिल्ह्यात खासदार, आमदारांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, बॅंका भाजपच्या ताब्यात आहेत. बीड जिल्हा दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आगामी निवडणुकीत ही ओळख कायम ठेवण्यासाठी आतापासूनच मिशन मोडवर कामाला लागा," असे आवाहन  आवाहन ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. 

औरंगाबाद येथे शुक्रवारी भाजपच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व बुथ विस्तारकांची बैठक झाली. आमदार सुजितसिंह ठाकूर, भाऊराव देशमुख, आमदार  भीमराव धोंडे, सुरेश धस, आर. टी. देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, सुभाष धस उपस्थित होते. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, "  गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड जिल्हयाला वेगळी ओळख आहे. त्यांनी पाहिलेले जिल्हयाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. माझ्या मुलासारखे प्रेम मी या जिल्हयावर करते. "

"कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या ताकदीमुळे बीड हा दिवंगत मुंडे यांचा बालेकिल्ला होवू शकला. बेरजेचं राजकारण आणि निर्भीडपणा दिवंगत मुंडेंनी शिकविला. त्यांचे आशीर्वाद व तुमची साथ यामुळे मी कधीच मागे हटणार नाही ",असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

"२०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाताना सर्वांनी जीव ओतून काम करायचे आहे. खासदारासह सहाही मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत. अस्तित्वाची लढाई समजून आजपासूनच कामाला लागा ," असे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित लेख