टोपले बनविणाऱ्या आईवडिलांनी मुलाला दिली प्रेरणा आणि तो फौजदार झाला....

टोपले बनविणाऱ्या आईवडिलांनी मुलाला दिली प्रेरणा आणि तो फौजदार झाला....

भवानीनगर : आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित आईवडिलांनी चारही मुलांना आश्रमशाळेत ठेवलं. दहावीपर्यंत त्यांचा संपर्कही झाला नाही. पण, परिस्थिती बदलायची आहे, हा जो जो मंत्र आईवडिलांनी दिला. तो मनात साठवला धाकट्या मुलाने. आयटीआयमधून टर्नर झाल्यानंतर  झेप घेत तो फौजदार बनला.

कैकाडी समाजालाच नव्हे, तर आजच्या तरुणाईला आदर्श वाटणारी आयुष्याची खडतर प्रवासाची कहाणी सणसरमधील हिंगणेवाडी (ता. इंदापूर) येथील सतेश शिवाजी जाधव या तरुणाची आहे. नुकतेच प्रशिक्षण संपवून ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात फौजदारपदी रुजू झाले आहेत. त्यांचा रविवारी (ता. 13) हिंगणेवाडी ग्रामस्थांनी सत्कार केला. त्या वेळी त्यांच्या आयुष्याचा प्रवास ऐकून साऱ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला.

सतेश यांचा थोरला भाऊ बारामतीत लेबर कॉन्ट्रॅक्‍टरचा व्यवसाय करतो. आईवडील पारंपरिक ग्रामोद्योग म्हणून कन्हेरीच्या फोकापासून झाप विणने, टोपल्या बनविण्याची कामे करतात. त्यासाठी अनेकदा त्यांना कोकणात जावे लागायचे. मुलांच्या भवितव्यासाठी पैसे गाठीला ठेवण्यासाठी धडपड करताना आपल्यामागे मुलांची आबाळ होऊ नये म्हणून साखरवाडी, फलटण येथील आश्रमशाळेत मुलांना ठेवले. पाचवीपर्यंत मुले आश्रमशाळेत शिकली. पुढे मामाकडे गोतोंडी येथे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अकरावी व बारावीला मात्र सतेश जाधव भवानीनगरला आले, तेथेच आईवडिलांची मग भेट झाली. मात्र, ही दोन वर्षे त्याने गुरे व शेळ्या राखूनच पूर्ण केली.

बारावीनंतर त्वरित रोजगार मिळेल म्हणून इंदापूरच्या आयटीआयमधून टर्नरचे प्रशिक्षण घेतले. मात्र, तेवढ्यात राज्य राखीव पोलिस दलाची भरती निघाली. सतेश जाधव यांनी प्रयत्न केला आणि भरती झाले. त्यात पाच वर्षे सेवेत घालविल्यानंतर आई चांगुणा व वडील शिवाजी यांनी व भावानेही अजून थोडा मोठा हो, असा सल्ला दिला म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. एसआरपीच्या सेवेत असतानाच स्वतःच अभ्यास करून पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, म्हणून न खचता दुसरा प्रयत्न केला आणि फौजदारकीला गवसणी घातली.

परिस्थितीचा बाऊ करू नका. उगीचच त्याचे भांडवलही करू नका. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे ध्येय ठेवले, तर डोळ्यांसमोर इतर गोष्टी येतच नाहीत. ध्येयापुढे समस्याही येत नाहीत. माझ्यासाठी माझे आई-वडील देव होते आणि देवच आहेत, असे सतेश जाधव यांनी सांगितले. 

हिंगणेवाडी ग्रामस्थांची कौतुकाची थाप

प्रशिक्षण संपवून नुकत्याच रुजू झालेल्या सतेश जाधव व त्यांचा आईवडिलांचा सत्कार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, सणसरचे ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास कदम, विलास कदम, उद्धव कदम, हेमंत डांगे व सहकाऱ्यांनी केला. या वेळी बॅंक व्यवस्थापक बनलेले गावचे दुसरे सुपुत्र राजेंद्र कदम, निवृत्त सैनिक कृष्णा कदम यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन प्रतीक पवार, अक्षय कदम, दत्ता पवार, युवराज सपकळ, किरण सोनवणे व त्यांच्या मित्रांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com