सांगलीत संथ सुरवातीनंतर शेवटचा तास ठरला 'सुपर ओव्हर' 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांची रस्त्यावर उतरलेली फौज, अकरा तास निकराचा लढा देण्याच्या इराद्याने पेटून उठलेले साडेचारशे उमेदवार, त्यांचे हजारो कार्यकर्ते, मतदारांना घरातून केंद्रापर्यंत आणण्याच्या कामी लागलेली फळी आणि या साऱ्यांना आपल्या एका मताची ताकद दाखवण्यासाठी आलेले मतदार...
सांगलीत संथ सुरवातीनंतर शेवटचा तास ठरला 'सुपर ओव्हर' 

सांगली : कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांची रस्त्यावर उतरलेली फौज, अकरा तास निकराचा लढा देण्याच्या इराद्याने पेटून उठलेले साडेचारशे उमेदवार, त्यांचे हजारो कार्यकर्ते, मतदारांना घरातून केंद्रापर्यंत आणण्याच्या कामी लागलेली फळी आणि या साऱ्यांना आपल्या एका मताची ताकद दाखवण्यासाठी आलेले मतदार...

प्रचंड इर्षा, टशन, संशयकल्लोळ... भल्यामोठ्या प्रभागातील दमछाक, क्रॉस मतांचा बाजार आणि तो टाळण्यासाठी सुरु असलेली शर्थ... साडेपाच लाख लोकांच्या भवितव्याच्या फैसला करणाऱ्या या निवडणुकीचा माहोल सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील जनतेने "याची देही...' अनुभवला आणि सारेच त्याचा भाग झाले. 

महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीचा सोहळा ऐन पावसाळ्यात असल्याने साऱ्यांचे लक्ष मतदारांइतके आभाळाकडेही लागले होते. पावसाने साथ दिली. उघडीप मिळाली. वातावरण प्रसन्न राहिले. हवा चांगली होती. त्यात आपल्या पक्षाची, उमेदवाराची "हवा' करण्याची संधी साऱ्यांनी साधली. प्रचंड तणाव, अफवांचे पीक, एकमेकांना खुन्नस, मते खेचण्यासाठी लावलेली ताकद, कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि बदललेल्या प्रभाग रचनेमुळे "काय होणार?' या चिंतेने ग्रासलेले चेहरे स्पष्टपणे जाणवत होते. माहोल किती तापलाय, याची साक्ष पटत होती. सर्व यंत्रणा मैदानात उतरल्याने जत्रेचे स्वरुप आले होते. 

प्रशासनाने मताचा टक्का वाढवण्यासाठी "एक ऑगस्ट, मतदान फर्स्ट', अशी महिनाभर मोहिम राबवली, मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत खटाटोप करावा लागला. साऱ्यात एक चर्चा जोरात रंगली ती "क्रॉस व्होटिंग' की "पॅनेल टू पॅनेल' याचीच. एकमेकांविषयी संशयकल्लोळामुळे वातावरण ढवळून निघाले. "इकडे पैसे वाटताहेत', असे शेकडो संदेश पोलिसांना मिळत होते. हाणामारीच्या बातम्यांना ऊत आला होता. इकडे मशीन बंद पडली, तिकडे घोटाळा झालाय, अशा अफवांचे पीक गरम होते.

कुठल्याच तक्रारीकडे दुर्लक्ष न करता पोलिस तत्काळ धाडसत्र राबवत होते. बहुतांश उमेदवारांनी कार्यकर्त्यांची फळी विरोधकांच्या मागे लावली होती. पैशांचे वाटप कुठे होतेय, याचा मागमूस घेतला जात होता. प्रभाग अकरामध्ये एका माजी महापौराला त्याचा झटका बसला. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि सोडून दिल्याची माहिती शहरभर पसरली. गावभागात पैसे वाटताना एका अतिप्रतिष्ठाताला विरोधकांनी रोखत नजरकैदेतच ठेवले. प्रभाग पंधरामध्ये मतदार यंत्रात घोळ झाल्याच्या बातमीने दंगा उठला. टिंबर एरियात एक मतदान यंत्र बंद पडल्याने रांग बराच वेळ थांबून होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com