Farmers tored banners | Sarkarnama

निर्णयापुर्वीच सरकारच्या अभिनंदनाचे फलक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जून 2017

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. पण त्याची खिल्ली उडवण्याचे काम सरकार व त्यांच्या समर्थकांकडून सुरू असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून काही भागात उभारण्यात आलेल्या डिजीटल फलकावरून दिसत आहे.

प्रश्‍न कर्जमुक्तीचा : फलक फाडून शेतकरी संघटनांकडून निषेध

कोल्हापूर - शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यापुर्वीच शहर व परिसरात सरकारचे अभिनंदन करण्यासाठी लावलेले डिजीटल फलक फाडण्यात आले आहेत. हा प्रकार म्हणजे "मूल होण्याआधीच पेढे वाटणे' असा असल्याचा संदेश सोशल मिडीयावर फिरू लागला असून त्यातून सरकारबरोबरच फलक लावणाऱ्यांची "टर' उडवली जात आहे. यानिमित्ताने गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेला शेतकरी विरूध्द सरकार संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्यभर आंदोलन पेटले आहे. दोन्ही कॉंग्रेसची संघर्ष यात्रा, स्वाभिमानी' चे खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्‍लेश यात्रा, शिवसेनेचाही संवाद या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण सरकारकडून हा मुद्दा बेदखल केला जात आहे. सरकारच्या निषेधार्थ व सरसकट कर्जमाफीसाठी 1 जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर आहेत. या संपाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटले आहेत. रस्त्यावर दूध ओतणे, भाजीपाला विस्कटून टाकणे, बाजार समितीतील सौदे रद्द करणे, मुंबई, पुण्याला जाणारा शेतमाल अडवणे या माध्यमातून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. पण त्याची खिल्ली उडवण्याचे काम सरकार व त्यांच्या समर्थकांकडून सुरू असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून काही भागात उभारण्यात आलेल्या डिजीटल फलकावरून दिसत आहे.

कर्जमाफी देणार पण ती सरसकट नाही, ऑक्‍टोबरपर्यंत अभ्यास करणार अशा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार करत आहेत. प्रत्यक्षात तसा कोणताही आदेश सरकारने काढलेला नाही. पण तोपर्यंत शहराच्या काही भागात कर्जमाफीबद्दल सरकारचे अभिनंदन करणारे डिजीटल फलक भागाभागात उभारले जात आहेत. विशेषतः मध्यरात्रीच्यावेळीच हे फलक उभारले जातात. त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि अर्थमंत्र्यांची छबी झळकत आहे. खरोखरच निर्णय झाला असेल तर मग रात्रीचे फलक उभारण्यामागे गौडबंगाल काय ? असा एक प्रश्‍न उभा रहात आहे. पण या फलकावरून पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू असल्याच्या भावना व्यक्त करत हे फलक फाडून टाकण्यात येत आहे. सरकारच्या समर्थकांकडून हे फलक उभे आहेत, फाडलेल्या फलकाप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचे धाडस मात्र या समर्थकांकडून होत नाही.

 

संबंधित लेख