आंदोलन नाशिकला कोंडी मात्र गुजरातची - शेतकरी संपासाठी बाजार समित्यांना टाळे

राज्य सरकारने शेतक-यांची कोंडी केली आहे. त्यामुळे त्याची धग सरकार व त्यांच्या पक्षाला बसली पाहिजे. गुजरातला कोणताही भाजीपाला व शेतमाल जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ - माजी आमदार दिलीप बनकर, अध्यक्ष, पिंपळगाव बाजार समिती.
आंदोलन नाशिकला कोंडी मात्र गुजरातची - शेतकरी संपासाठी बाजार समित्यांना टाळे

नाशिक : शेतकरी संपामुळे राज्य शासनाची कोंडी तर होणार आहेत. मात्र, नाशिकहून मोठ्या प्रमाणावर गुजरातच्या सूरत, अहमदाबाद, बडोदा, मेहसाणा, वापी या व्यापारी शहरांना ताजा भाजीपाला, कांदा पाठविला जातो. तो पुरवठा खंडीत केल्यास गुजरातमध्ये भाजप विरोधी चर्चा होऊ शकते, यादृष्टीने सर्व बाजार समित्या बंद ठेउन दोन्ही काँग्रेसकडून वातावरण तापविण्याचे डावपेच आखले जात आहेत. नाशिकच्या बाजार समित्या बंद राहिल्या तर त्याचा परिणाम गुजरातच्या ग्राहकांना भोगावा लागणार आहे.

उद्या (ता.1 जून) पासून राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी संपावर जात आहेत. नाशिक हा शेतीमालाचे उत्पादन - व्यापाराबरोबरच शेतकरी आंदोलनाचा इतिहास असलेला जिल्हा असल्याने राज्यभरातील नेत्यांचे इकडे लक्ष लागले आहे. शेजारच्या गुजरात व मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांत नाशिकहून फळे, भाजीपाला मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. सूरत, अहमदाबाद, गांधीनगर, वापी, बडोदा या शहरांतील किरकोळ भाजीबाजार पूर्णतः नाशिकवर अवलंबून असतो. त्यामुळे या काळात गुजरातहून दुधाचा पुरवठा महाराष्ट्राला होऊ नये व भाजीपाला गुजरातला जाऊ नये यासाठी सर्व सतरा बाजार समित्यांनी 'बंद'ची हाक दिली आहे.

पिंपळगाव बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप बनकर यांनी त्यासाठी सर्व सहकार्य केले आहे. द्राक्ष बागायतदार संघाच्या नेत्यांनी आपले 'कोल्ड स्टोअरेज' या कालावधीत शेतक-यांचा भाजीपाला साठविण्यासाठी विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यासाठी डी. बी. मोगल यांनी पुढाकार घेतला आहे. नाशिकला सर्वाधिक 3962310 टन भाजीपाला व फळे, लासलगावला 3619460 टन कांदा व धान्य तसेच पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) समितीत 7551664 टन कांदा, टोमॅटो, भाजीपाल्याची आवक होते. दिंडोरीला 1164353 टन भाजीपाला उलाढाल होते व ती सर्वच्या सर्व सुरतेच्या बाजारात जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, माजी आमदार धनराज महाले यांनी बाजार समितीच बंद ठेऊन गुजरातला माल जाऊ नये याच्या नियोजनासाठी काल बैठक घेतली. त्यामुळे शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात दोन्ही काँग्रेसच्या उघड सहभागाने राजकीय पक्षांमध्ये उत्साह संचारला आहे. शिवसेनेचाही त्यांना पाठींबा मिळत असल्याने भाजपचे नेते, संचालक कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. 'आंदोलन नाशिकचे व कोंडी गुजरातची' असे डावपेच त्यानिमित्ताने आखले जात आहेत.  

सूरत, मुंबईची कोंडी
नाशिक हा भाजीपाला आणि दूध उत्पादन होणारा महत्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात 17 बाजार समित्या असून त्यांची वार्षिक उलाढाल 5300 कोटी रुपये असून त्यांना 26.50 कोटींचे उत्पन्न मिळते. यातील सर्वाधीत उलाढाल लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि नाशिक या तीन समित्यांची आहे. माजी आमदार दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे त्यावर वर्चस्व असून त्या राज्यातील आघाडीच्या संस्था आहेत. मुंबई, सूरत, अहमदाबाद, दिल्लीसह विविध शहरांना येथून माल जातो. त्या बंद राहणार असल्याने त्याचा ग्राहकांवर नक्कीच परिणाम जाणवेल.

अन्य समित्यांवरही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्राबल्य आहे. या समित्यांनी शेतकरी संपाला पाठींबा म्हणून बाजार समित्या बंद ठेवण्याची घोषणा केल्याने व्यापा-यांना इच्छा असली तरीही व्यवहार होणार नाहीत. जे नेते नुकतेच भाजपमध्ये गेले आहेत त्यांची मात्र यानिमित्ताने राजकीय कोंडी झाल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com