farmers strike | Sarkarnama

शेतकऱ्यांचा संप मिटण्याऐवजी चिघळण्याची शक्‍यता

महेश पांचाळ / गोविंद तुपे
शनिवार, 3 जून 2017

या आंदोलनाची तीव्रता लक्षात येताच सरकारनेही वाटाघाटीसाठी प्रयत्न सुरू केले. आपल्या चाणाक्ष बुद्धीने व्यूहरचना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोअर कमिटीमधील जयाजीराव सूर्यवंशी आणि काही सदस्यांना गळाला लावण्यात यश मिळविले. या सदस्यांसोबत यशस्वी चर्चा झाली असून संप मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पहाटे पत्रकार परिषद घेऊन दिली. 

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपावर राज्य सरकारने तोडगा काढला असल्याची माहिती दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे पत्रकार परिषद घेऊन दिली होती. मात्र काही तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनीच आमची दिशाभूल केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यासोबत वाटाघाटी करण्यासाठी आलेल्या कोअर कमिटीमधील सदस्यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली असून संप आणखी चिघळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे संपाचे हत्यार म्यान होण्याऐवजी या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात तयार झाली असल्याचे बोलले जाते. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी 1 जून पासून संप पुकारला आहे. या संपाला शेतकऱ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर दुधाचे टॅंकर खाली ओतून शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदविला. तर काही ठिकाणी आपला शेतमाल बाजारात आणण्याऐवजी रस्त्यावर, शेताच्या बांधावर टाकून शेतकऱ्यांनी या संपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. 

या आंदोलनाची तीव्रता लक्षात येताच सरकारनेही वाटाघाटीसाठी प्रयत्न सुरू केले. आपल्या चाणाक्ष बुद्धीने व्यूहरचना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोअर कमिटीमधील जयाजीराव सूर्यवंशी आणि काही सदस्यांना गळाला लावण्यात यश मिळविले. या सदस्यांसोबत यशस्वी चर्चा झाली असून संप मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पहाटे पत्रकार परिषद घेऊन दिली. 

विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला कोअर कमिटीमधील सदस्य जयाजीराव सूर्यवंशी आणि इतर काही सदस्य होते. मात्र एकतर्फी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे अनेक संघटनांनी आमचा संप सुरूच राहणार असा इशारा दिल्याने सरकारची आणि कोअर कमिटीची पंचाईत झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपात फूट पाडल्याचा आरोप संघटनांकडून होत आहे. 

विशेष म्हणजे संप मिटल्याची घोषणा करणारे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन पाऊले मागे घेतले पाहिजे असे सांगणाऱ्या जयाजीरावांनीही अगदी काही तासात यु टर्न घेतला. आणि सरकारने आमची दिशाभूल केली. आम्ही हा घाईघाईत निर्णय घेतला असल्याची कबुली जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिल्याने मुख्यमंत्री तोंडघशी पडले आहेत. 

या आंदोलनाचे मूळ असलेल्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी कोअर कमिटीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. एवढेच नाही तर विविध कामगार संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री रस्त्यावर जाऊन चर्चा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर या संपावर सरकार यशस्वी तोडगा काढण्यात अपयशी ठरले तर 5 जून रोजीच्या महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

संबंधित लेख