Farmer"s representatives reach mumbai warn statewide strike on Monday | Sarkarnama

किसान क्रांतीचे सदस्य चर्चेसाठी मुंबईत ;  सोमवारी "महाराष्ट्र बंद"

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

सकारात्मक निर्णय न झाल्यास पाच जूनला "महाराष्ट्र बंद' आणि सहा जूनला सर्व सरकारी कार्यालयांना कुलूप लावू. कोणत्याच मंत्र्याला सात जूनला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही.

पुणतांबे: शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी किसान क्रांतीचे सुमारे पंधरा सदस्य आज मुंबईला रवाना झाले. चर्चा यशस्वी न झाल्यास सोमवारी (ता. पाच) "महाराष्ट्र बंद' ठेवण्याचा निर्णय त्यापूर्वी कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी किसान क्रांतीच्या नेत्यांसह सुमारे 15 सदस्य संध्याकाळी चार वाजता मुंबईकडे रवाना झाले. मंत्रालयात रात्री उशिरा बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्या आधी शेतकऱ्यांच्या संपाचे केंद्र असलेल्या पुणतांब्यात आज किसान क्रांतीच्या "कोअर कमिटी'च्या सदस्यांची बैठक झाली. 

बैठकीनंतर सूर्यवंशी, धनंजय जाधव पत्रकारांशी बोलले. ते म्हणाले, ""मंत्रालयातून आम्हाला चर्चेचे निमंत्रण आले आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा होईल. चर्चेनेच प्रश्‍न सुटतो याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळेच आम्ही चर्चा करणार आहोत. त्यातून सकारात्मक निर्णय न झाल्यास पाच जूनला "महाराष्ट्र बंद' आणि सहा जूनला सर्व सरकारी कार्यालयांना कुलूप लावू. कोणत्याच मंत्र्याला सात जूनला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही.'' 

संबंधित लेख