Farmers are not Criminals say Aditya Thakre | Sarkarnama

कर्जमाफी करायला शेतकरी गुन्हेगार आहेत का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

जलील पठाण
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

लातूर जिल्ह्यातील बुधोडा (ता. औसा) गावातील शेतकऱ्यांशी ठाकरे यांनी सोमवारी संवाद साधला. कर्जमाफी आणि पीकविमा वाटपात झालेला सरकारचा गोंधळ यावर ठाकरे यांनी टीका केली.

बुधोडा (जि. लातूर)  : ''एखाद्या गुन्हेगाराला किंवा अपराध्याला माफ केले जाते. महाराष्ट्रातला शेतकरी गुन्हेगार आहे का? आम्हाला कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे. मोठमोठे होर्डिंग लावून कर्जमाफीचा डांगोरा पिटला जात असताना कर्जमाफी कोणाला झाली, याची माहिती मिळत नाही. मी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे एकाही शेतकऱ्याने कर्जमाफी झाली, असे सांगितलेले नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाचे मतदार असला तरी शिवसेना या दुष्काळात खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे,'' असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

लातूर जिल्ह्यातील बुधोडा (ता. औसा) गावातील शेतकऱ्यांशी ठाकरे यांनी सोमवारी संवाद साधला. कर्जमाफी आणि पीकविमा वाटपात झालेला सरकारचा गोंधळ यावर ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ''शेतकऱ्यांच्या मोबाईलवर नुसते कर्जमाफीचे संदेश आले. परंतु बँकांनी त्यांना उभेसुद्धा राहू दिले नाही. फक्त घोषणा झाली. परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी झाली का? पीकविमा देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून कोणाला शंभर रुपये तर कोणाला त्याही पेक्षा कमी पीकविमा मिळाला आहे."

सरकारच्या वतीने या संकटाच्या काळात तुमच्यापर्यंत कोण आले, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारताच नाही...असा आवाज शेतकऱ्यामधून आला. या वेळी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार दिनकर माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, अभय साळुंके, बालाजी गिरे उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख