farmer strike | Sarkarnama

कर्जमाफीचा पुणतांब्यात जल्लोष  अलिंगन प्रेमाचे, विजयाचे अन एकजुटीचे 

मुरलीधर कराळे 
रविवार, 11 जून 2017

नगर ः मागील पंधरा दिवस रात्रीचा दिवस केला... मिडियाची ये-जा, नेत्यांची भाषणे, आंदोलकांच्या घोषणांनी दणाणून गेलेल्या पुणतांबे गावाने आता सुटकेचा निःश्वास टाकत आनंद साजरा केला. शेतकऱ्यांना कर्ज माफ झाल्याची बातमी धडकताच जल्लोष सुरू झाला. शेतकऱ्यांनी एकमेकांना अलिंगन देत पेढे भरविले. गुलालाची मुक्त उधळण करीत शेतकरी आनंदाने नाचले. निसर्गही पावसाच्या रुपाने तुषारांचा शिडकाव करीत त्यांच्या आनंदात सहभागी झाला. 

नगर ः मागील पंधरा दिवस रात्रीचा दिवस केला... मिडियाची ये-जा, नेत्यांची भाषणे, आंदोलकांच्या घोषणांनी दणाणून गेलेल्या पुणतांबे गावाने आता सुटकेचा निःश्वास टाकत आनंद साजरा केला. शेतकऱ्यांना कर्ज माफ झाल्याची बातमी धडकताच जल्लोष सुरू झाला. शेतकऱ्यांनी एकमेकांना अलिंगन देत पेढे भरविले. गुलालाची मुक्त उधळण करीत शेतकरी आनंदाने नाचले. निसर्गही पावसाच्या रुपाने तुषारांचा शिडकाव करीत त्यांच्या आनंदात सहभागी झाला. 

पुणातांबे गावात शेतकरी संपाचा पहिला ठराव झाल्यानंतर राज्यभर अडीच हजार ठराव झाले. कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव मिळाल्याशिवाय पेरणीच करायची नाही, असा हट्टच शेतकऱ्यांनी धरला. त्याचाच परिणाम म्हणून शेतीमाल शहरात जाण्याचे रोखून सरकारला जाग आणली. एक जूनपासून आंदोलन सुरू झाल्यानंतर लगेचच पहिल्या तीन दिवसांत सरकारला आंदोलनाचे स्वरुप लक्षात आले. संपूर्ण राज्यात आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. 

स्थानिक पातळीवर दोन गट झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन एका गटाने केले. मात्र दुसऱ्या गटाने आंदोलन तीव्र केले. पुन्हा मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या गटाला व शेतकरी नेत्यांना बोलून बैठक घेऊन आश्वासनांची खैरात केली. त्यांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र या आंदोलनाची दोरी थेट सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हाती गेली. कोणीच एकत्र नव्हते. आंदोलन अधिकच भडकत होते. अखेर सरकारने नमते घेत सरसगट कर्जमाफी दिली. 

उद्या मिरवणूक 
पुणतांबे गावात उद्या (सोमवारी) भव्य मिरवणूक काढण्याचे नियोजन सुरू आहे. गेले पंधरा दिवस आंदोलनात सहभाग घेतला. गावातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःचा भाजीपाला, दूध, फळे रस्त्यावर ओतून नुकसान सहन केले. आता सर्व मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. पंचक्रोशितील ग्रामस्थही या विजयी मिरवणुकीत सहभागासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले. 

गटबाजीला तिलांजली 
आंदोलनात राजकारण घुसल्याने तिनही धनंजयमध्ये फूट पडली होती. मात्र ही आनंदाची बातमी मिळताच गटबाजीला तिलांजली देण्यात आली. दुपारी गावात दोन ठिकाणी गुलालाची उधळण झाली. ग्रामपंचायत हॉलसमोर डॉ. धनवटे गटाने आनंद व्यक्त केला. या वेळी बाळासाहेब भोरकडे, राहुल धनवटे, बाळासाहेब चव्हाण आदींनी पेढे भरवित विजय साजरा केला. धनंजय जाधव यांच्या गटाने स्टेशन रस्त्यावर गुलालाची उधळण केली. या वेळी माजी सरपंच सर्जेराव जाधव, सुधाकर जाधव, गणपत वाघ, गणेश बनकर, संभाजी गमे आदी उपस्थित होते. 

हा एकजुटीचा विजय ः धोर्डे 
आंदोलनाची मुख्य संकल्पना मांडणारे आंदोलनाचे नेते धनंजय धोर्डे यांनी सरकारनामा शी बोलताना आनंद व्यक्त केला. हा विजय कोणात्या नेत्याचा नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा विजय आहे. महाराष्ट्रात ही क्रांती सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. 

नवीन क्रांतिचा उदय ः डॉ. धनवटे 
देशात एका नवीन क्रांतिचा उदय झाला आहे. आता शेतकरीही एकत्र येऊ शकतो, हे जगाला दाखवून दिले आहे. त्याची सुरुवात पुणतांब्यातून झाली, याचा आम्हाला अभिमान आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होत भाजीपाला, दूध रस्त्यावर ओतले. त्या सर्वांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनाचे नेते डॉ. धनंजय धनवटे यांनी सरकारनामा शी बोलताना व्यक्त केली. 

राज्यातील शेतकऱ्यांचा विजय ः जाधव 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा हा विजय आहे. या पुढे शेतकरी एक होऊ शकतो, राजकर्त्यानी लक्षात ठेवावे. आंदोलनामुळे शहरी नागरिकांना मोठा त्रास झाला, त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया आंदोलनाचे नेते धनंजय जाधव यांनी दिली. 

संबंधित लेख