farmer adopt | Sarkarnama

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना घेणार विखे पाटील दत्तक ! 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 4 जून 2017

नगर: नगर जिल्ह्यातील 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय विखे पाटील कुटुंबियांनी घेतला असून, डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज ही घोषणा केली. 

नगर: नगर जिल्ह्यातील 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय विखे पाटील कुटुंबियांनी घेतला असून, डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज ही घोषणा केली. 

येत्या 15 जून रोजी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब सहाय्य योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्यात नोव्हेंबर 2014 पासून आत्महत्या केलेल्या 208 शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालकत्व विखे पाटील परिवार जनसेवा फाऊंडेशनमार्फत 15 जूनपासून स्वीकारणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. या योजनेंतर्गत संबंधीत शेतकरी कुटुंबांच्या अनेक जबाबदाऱ्या विखे पाटील परिवाराने आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत. 

यासंदर्भात विस्तृत माहिती देताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, "" विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन्मदिनी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन झाल्याने यावेळी त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा असा उपक्रम सुरू करण्याचा विचार मागील अनेक आठवड्यांपासून सुरू होता. त्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना दत्तक घेण्याची प्रेरणा मिळाली.'' 

या योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह सोहळा, आरोग्य सुविधा आदी जबाबदाऱ्या विखे पाटील कुटूंब स्वीकारणार आहे. याशिवाय या 208 शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी आणि महिलांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी तसेच बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित शेतकरी कुटुंबाचे घर राहण्यास योग्य नसेल तर त्यांना घर दुरुस्तीसाठीही सहकार्य केले जाणार आहे. शिवाय या कुटुंबांचा अपघात विमा देखील काढला जाणार आहे. येत्या 15 जून रोजी हा कार्यक्रम होणार आहे. 

संबंधित लेख