फडणवीससाहेब, मुख्यमंत्रीपदाला शोभेल अशी भाषा बोला ! 

यशवंतराव चव्हाण हे आपल्या भाषणांत सुंदर वाक्‍यांची पेरणी करीत. त्यांच्या वाणीला चीड, द्वेष, राग यांचा संसर्ग झालेला कधी दिसत नसे. यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस असा विचार करता विद्यमान मुख्यमंत्र्यांकडूनही अहंकाराचा दर्प कोठे दिसणार नाही हीच जनतेला अपेक्षा आहे. आपण करिअरच्या टॉपवर आहात त्यामुळे आपल्या तोंडी रस्त्यावरची भाषा शोभून दिसत नाही.
 फडणवीससाहेब, मुख्यमंत्रीपदाला शोभेल अशी भाषा बोला ! 

महाराष्ट्रात जर सत्तांतर झाले तर मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता येईल असे मत कॉग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले होते. देवेंद्रजी, हे गेल्या साडेतीन वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. एक वादातीत मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. 

महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस असे विविध मुख्यमंत्री लाभले. या सर्वच मुख्यमंत्र्यांनी या पदाची प्रतिष्ठा जपली. काही मुख्यमंत्री असे होते त्यांना कोणी गांभीर्याने घेतलेच नाही. अशा मुख्यमंत्र्यांच्या पंगतीत विद्यमान मुख्यमंत्री बसू पाहात आहेत की काय अशी शंका भाजप महामेळाव्यातील त्यांचे भाषण ऐकून झाली. 

मुख्यमंत्र्यांनी, अमित शहांसमोर जीव तोडून भाषण करताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जी टीका केली ती राष्ट्रवादीच्याच नव्हे तर भाजपच्या मंडळींनाही आवडली असेल असे वाटत नाही. वास्तविक त्यांनी टीका करायची नाही का ? तर शंभर टक्के टीका केली पाहिजे. पण, ज्या अविर्भावात त्यांचे भाषण झाले आणि आमच्या नादाला लागू नका अशी इशारे वजा धमकीची भाषा वापरली ती रस्त्यावरील भाषा होती असे म्हणावे लागेल. 

फडणवीस यांना क्रिकेटपटू म्हणून संदीप पाटील खूप भावतात. आपल्या सळसळत्या बॅटने तो गोलंदाजाच्या चिंधड्या उडवायचा. बॉब विलिसच्या सहा बॉलवर सहा चौकार ठोकणारा तो महान फलंदाज होता. त्यांची आक्रमकता राजकारणाच्या मैदानावर तशीच दिसून येते. 2014 पूर्वी सत्तेत येण्याअगोदर ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांवर तुटून पडत. त्यांना सळो की पळो करून सोडत. टीका आणि आरोप करताना मात्र त्यांनी कधीही पातळी ओलांडली नाही. कोणताही चुकीचा शब्दप्रयोग केला नाही याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे. मात्र महामेळाव्यातील त्यांचे भाषण म्हणजे आक्रस्ताळेपणाचा कळस होता. 

भाषणात केवळ आक्रमकता होती. शरद पवारांनी राजकारणात नेहमीच यशवंतराव चव्हाण यांच्या आचारविचाराना आदर्श मानले. त्यांचे आदर्श विचार अंगिकारत आयुष्यभर वाटचाल केली. त्यांच्यावर अनेकवेळा बिनबुडाचे आरोप करण्यात आले.अगदी खालच्या पातळीवर टीका करण्यात आली पण, त्यांचा कधीही तोल सुटला नाही. जे टीका करीत होते पुढे तेच साहेबांपुढे नतमस्तक झाले हा इतिहास आहे. 

यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख असतील किंवा मनोहर जोशी किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील असे अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीची प्रतिष्ठा वाढविली. त्यांच्या पंक्तीत देवेंद्रजी बसले असे बोलले जात होते. विरोधी पक्षाची नेते मंडळी फडणवीसांकडे एक सुसंस्कृत नेते म्हणून पाहत आली आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राचे फडणवीससाहेब आपण मुख्यमंत्री आहात. त्यामुळे तुमच्या तोंडी धडा शिकविण्याची भाषा शोभून दिसत नाही. 
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शान राखली पाहिजे. त्यांनी जी भाषा वापरली ती मुळीच समर्थनीय ठरत नाही. आपण मुख्यमंत्रीपदावर आहोत याचे भान त्यांना राहिले नाही. मफलरने गळा आवळण्याची भाषा करणारे "राज' कारणी आणि आपल्यात फरक तो काय ? असे उद्या कोणीही म्हणू शकतो. महामेळाव्यात आपण जी भाषा वापरली ती यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी वापरली असे वाटत नाही. 

विरोधक गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे तुम्हाला अधिकारच आहेत. आपण मुख्यमंत्री आहात. सत्ता तुमच्या हातात आहे. त्यामुळे हातवारे करून कर्कश आवाजात विरोधकांना दम भरणे लोकांना आवडले आहे असे वाटत नाही. मुख्यमंत्राच्या खुर्चीला शोभेल अशीच टीका तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्या दिवसाचे तुमचे भाषण भरकटत गेले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना खूष करण्यासाठी तुम्ही असे भाषण केले असेल असेही वाटत नाही. तसा संदेश मात्र लोकांमध्ये गेला. भाषणात आपण थोड्या कोपरखळ्या, चिमटे काढले असते तर अधिक भावले असते. 

आपल्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तुमचा समाचार घेताना टीका केली. तुमचे वय काढले, लायकी काढली. पण, धनंजयरावांनी थोडी मुख्यमंत्रीपदाचीही प्रतिष्ठा ठेवायला हवी होती. तुम्ही घसरला म्हणून ते ही घसरले. सत्ताधारी आणि विरोधकांचा कलगीतुरा असा रंगला पाहिजे की महाराष्ट्राने नेहमीच त्याची दखल घेतली पाहिजे. सध्या तसे होताना दिसत नाही. 

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाहीत असा इशारा तुम्ही दिलात तो महाराष्ट्राच्या पचनी पडला नाही. राजकारणात हारजीत होत असते. पण, शरद पवारांना संपविणे इतके सोपे आहे का ? नाद करायचा नाही, खुळा नाद, बघून घेऊ, धडा शिकवू अशी रस्त्यावरची भाषा कोणत्याही सुसंस्कृत नेत्यांच्या तोंडी शोभून दिसत नाही. 

यशवंतराव चव्हाण हे आपल्या भाषणांत सुभाषितवजा सुंदर वाक्‍यांची पेरणी करीत. ते संयमी राजकारणी होते. त्यांचा आपल्या वाणीवर विलक्षण ताबा होता. ते मोजके आणि मुद्देसुद बोलत. सर्व विषयांवर बोलत, सर्व प्रसंगी बोलत. समोरील श्रोत्यांच्या पातळीवर जाऊन सर्वांना समजेल असे मिठ्ठास भाषण ते करीत. शब्दांनी केलेल्या जखमी जन्मभर झोंबत राहतात. त्यांच्या वाणीला चीड, द्वेष, राग यांचा संसर्ग झालेला कधी दिसत नसे. विजयी वातावरणात त्यांच्या वाणीमध्ये अहंकाराचा दर्पही कोठे दिसत नसे. शब्दांचे भांडार त्यांच्याकडे होते. भाषणात प्रभावीपणे ते आपली मते मांडत असत. तशीच अपेक्षा तुमच्याकडूनही आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com