fadanvis transfers munde for fifth time | Sarkarnama

फडणवीसांच्या चार वर्षांच्या काळात तुकाराम मुंढेंच्या पाच बदल्या!

योगेश कुटे
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

पुणे : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त व धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागात सहसचिव या पदावर बदली झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगल्या पोस्टिंग द्यायचा प्रयत्न केला. पण ज्या वेगाने पोस्टिंग दिल्या त्याच वेगाने त्यांनी मुंढे यांची बदली करण्यासही मागेपुढे पाहिले नाही.

पुणे : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त व धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागात सहसचिव या पदावर बदली झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगल्या पोस्टिंग द्यायचा प्रयत्न केला. पण ज्या वेगाने पोस्टिंग दिल्या त्याच वेगाने त्यांनी मुंढे यांची बदली करण्यासही मागेपुढे पाहिले नाही.

मुंढे यांचे लोकप्रतिनिधींशी जुळत नाही, असा आता सर्वत्र अनुभव येत आहे. नियुक्ती केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवस मुंढे यांना सांभाळून घेतात. त्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून देतात. पण पुन्हा हात काढून घेतात, असे दिसून आले आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत मुंढे यांच्या पाच बदल्या झाल्या आहेत. फडणवीसांच्या काळात सातत्याने बदल्या होणाऱ्या अधिकाऱ्यांत मुंढे हे राज्यात पहिल्या क्रमांकावर आहेत.

फडणवीस हे आॅक्टोबर २०१४ मध्ये सत्तेवर आले. त्यानंतर त्यांनी राज्यभरात चांगले अधिकारी देण्याचा प्रयत्न केला. त्यातून मुंढे यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी नियुक्ती केली. तेथे त्यांच्या काळात चांगली कामे झाली. पण नेहमीप्रमाणे पालकमंत्री विजय देशमुख यांच्याशी त्यांचा खटका उडाला. मुख्यमंत्र्यांनी काही काळ मुंढे यांना `फ्रि हॅंड` दिला. पण तेथे ते फार काळ टिकू शकले नाहीत. तेथून वर्षाच्या आतच फडवणिसांनी त्यांना नवी मुंबई पालिकेचे आय़ुक्तपद दिले.

तेथे वर्षभरात लोकप्रतनिधींनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी सुरू केल्या. मुख्यमंत्र्यांनी काही काळ सावरून धरले. मात्र अविश्वास ठराव आल्याने मुंढे यांची बदली पुण्यातील पीएमपी या वाहतूक संस्थेवर करण्यात आली. तेथून नऊ महिन्यांतच फडणविसांनी त्यांना नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती दिली. येथे सत्ताधारी भाजपच्या नगरेसवकांनीच मुंढे यांना नकोसे केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव रोखून धरला. मात्र फारच दबाव वाढल्याने तेथूनही आता मुंबईत बदली झाली आहे.  

मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून सुरवात सोलापूर महापालिकेतून झाली. त्यानंतर धारणी येथील उपविभागीय अधिकारी (प्रशिक्षणार्थी म्हणून) झाली.  त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, विक्रीकर सहआयुक्त अशा पदांवर त्यांनी काम केले. गेल्या बारा वर्षांत त्यांच्या बारा बदल्या झाल्या आहेत.

मुंडे यांची बदली करताना त्यांना साईड पोस्टिग मिळणार नाही, याची काळजी मु्ख्यमंत्र्यांनी आतापर्यंत घेतली. महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण आता पाचव्यांदा नियुक्ती देताना फडणविसांनी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी नियोजन विभागात मुंढे यांना पाठविले आहे. येथे जनतेशी फार संपर्क येत नाही. त्यामुळे मुंढे लाइमलाइट मध्ये राहणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घेतल्याचे सांगण्यात आले. 

संबंधित लेख