In Fadanvis regime BJP has grown five fold in urban Maharashtra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पीयूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रिपदाचीही जबाबदारी, हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता

फडणवीसांच्या कार्यकाळात भाजपच्या नगरसेवकांमध्ये पाचपट वाढ

मृणालिनी नानिवडेकर 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

शिवसेनेत विश्‍लेषण
भाजपची साथ सोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय खरोखरच योग्य असेल काय, यावर शिवसेनेत आता चर्चा सुरू झाली असल्याचे समजते. 

मुंबई  : देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील भाजप नगरसेवकांची संख्या तब्बल पाच पटीने वाढली आहे. राज्यातील 25 महापालिकांत 208 नगरसेवक होते, ते आता थेट 1036 झाले आहेत. सांगली महापालिकेत एकही नगरसेवक नव्हता, तेथे आता तब्बल 41 नगरसेवक निवडून आले आहेत.

राज्यातील 27 महापालिकांपैकी 14 ठिकाणी भाजप स्वबळावर सत्तेत असून मित्रपक्षासह 2 महापालिकांत सत्तेत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नाशिक, नागपूर, लातूर, चंद्रपूर, पनवेल, मीरा भाईंदर उल्हासनगर आणि आता जळगाव, सांगली अशा महापालिका क्षेत्रात भाजप स्वबळावर निवडून आली आहे. औरंगाबाद तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप शिवसेनेसह सत्तेत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपने राज्याच्या शहरी भागात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबई महापालिकेतही भाजपने शिवसेनेच्या बरोबरीत स्थान मिळवले आहेच.

जयंत पाटील यांना धक्‍का
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली हा बालेकिल्ला राखण्यासाठी कॉंग्रेसशी असलेले मतभेद त्यागून एकत्रित आघाडी उभारण्याचा निर्णय घेतला होता. तरीही सत्ता राखता आली नाही. कॉंग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विश्‍वजित यांनी सूत्रे हाती घेतली असताना हा पराभव झाला आहे.
कॉंग्रेसचा गड असलेल्या सांगलीत पराभव पत्करावा लागला तर जळगावमध्ये दोन्ही पक्षांना खातेही उघडता आले नाही.

 

संबंधित लेख