Face off between YUWA sena & ABVP in university election | Sarkarnama

मुंबई विद्यापीठ :युवा सेना – अभाविप पुन्हा आमने सामने

तुषार खरात : सरकारनामा न्यूज ब्युरो
शुक्रवार, 2 मार्च 2018

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेतील १० पदवीधरच्या  जागांसाठी येत्या २५ मार्च रोजी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने युवा सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुनश्चः आमनेसामने येणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) तयारीबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेतील १० पदवीधरच्या  जागांसाठी येत्या २५ मार्च रोजी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने युवा सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुनश्चः आमनेसामने येणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) तयारीबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची निवडणूक झाली. अध्यक्ष व सचिव या दोन्ही पदांवर युवा सेनेचे उमेदवार निवडून आले. अध्यक्ष व सचिव हे अधिसभेचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे अधिसभेत दोन प्रतिनिधींचा प्रवेश झाल्याने युवा सेनेचा हुरूप वाढला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी युवा सेना व अभाविपने जोरदार मोर्चेंबांधणी केली होती. अभाविपचे माजी कार्यकर्ते असलेले विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही या निवडणुकित लक्ष घातले होते, असे बोलले जात आहे.

आता विद्यार्थी चळवळीमध्ये अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या अधिसभेच्या पदवीधर जागांची निवडणूक सुद्धा प्रतिष्ठेची बनविण्यात आली आहे. या १० जागा जिंकून आणण्यासाठी अभाविप व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षभरापूर्वीच मतदारांचे अर्ज भरून आपली मतदान संख्या जास्तीची राहिल याची काळजी घेतली आहे. त्यामुळे २५ मार्च रोजी होऊ घातलेली निवडणूक अटीतटीची होईल, असे युवा राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.

गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत युवा सेनेचे ८ व मनविसेचे दोन उमेदवार निवडून आले होते. अभाविपला एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता. त्यामुळेच मागील अपयश धुवून काढण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते जोरदार तयारी करीत आहेत, तर युवा सेनेने आपल्या ८ जागा पुनश्चः मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

`आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकांची चांगली तयारी झाली आहे. सर्वच्या सर्व १० जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे` युवा सेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.  
 

संबंधित लेख