extortion complaint agaisnst mla gore | Sarkarnama

मी काय धंदे करतो त्याची माहिती घ्या : आमदार गोरेंविरुद्ध दहा कोटींच्या खंडणीची तक्रार

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 डिसेंबर 2018

नवी मुंबई : कॉंग्रेसचे साताऱ्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. श्रीकृष्ण गोसावी यांनी गोरे आणि त्यांचे स्वीय सहायक विशाल बगल यांनी खंडणीसाठी आपले अपहरण केल्याचे नमूद केले आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. 

नवी मुंबई : कॉंग्रेसचे साताऱ्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. श्रीकृष्ण गोसावी यांनी गोरे आणि त्यांचे स्वीय सहायक विशाल बगल यांनी खंडणीसाठी आपले अपहरण केल्याचे नमूद केले आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. 

पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार गोसावी यांनी नवी मुंबईत खारघर येथे कोयना प्रकल्पग्रस्त शेतक-यांकडून जमीन खरेदी केली आहे. पण गोरे यांचे पीए बागल यांनी वारंवार फोन करून गोसावी यांना भेटावयास बोलावले. भेटल्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव ठेवला. नवी मुंबईत बागल यांच्यासोबत गोसावींची भेट झाली. तेथून बागल गोसावी यांना पुण्याला घेऊन गेले व आमदार गोरे यांच्यासोबत भेट घालून दिली. पुण्यातील हॉटेल ऑर्चिड येथे रात्री 11.30 वाजता गोरे यांच्यासोबत भेट झाली. 

यावेळी गोरे मला म्हणाले की, तुम्ही विकत घेतलेल्या जमिनीमध्ये भागीदारी द्या किंवा रोख 10 कोटी रुपये द्या. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी रितसर जमीन खरेदी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कशासाठी भागीदारी किंवा पैसे देऊ. त्यावर गोरे म्हणाले की, कायदा सगळा माझ्याकडे आहे. तहसिलदार दीपक आकडे हे माझ्या पक्षाच्या आमदारांचे जावई आहेत. तुमचा सातबारा मी होऊ देणार नाही. मी माझे पीए विशाल बागल यांना आजच तहसिलदार आकडे यांच्याकडे त्यांच्या ऑफिसमध्ये पाठविले होते. तुम्ही टीएलआयआर यांचा अहवाल तहसिलदारांना देऊन सात ते आठ दिवस झाले आहेत. तरी अजूनपर्यंत तुमच्या सातबाऱ्याची नोंद झालेली नाही. यावरून तुम्ही समजून घ्या. तसेच मुख्यमंत्र्यांना सांगून तुमच्या जागेची परवानगी रद्द करून टाकेन. तुम्हाला व्यवहार पुढे सुरळीत करायचा असेल तर तुम्ही मला भागीदारी द्या किंवा रोख दहा कोटी रुपये द्या असे जयकुमार गोरे मला म्हणाल्याने मी त्यांना सदर प्रस्तावाला नकार दिला.

त्यावर गोरे यांनी मला धमकी दिली की, मी काय धंदे करतो ते माहिती करून घ्या. तुम्ही रस्त्यावरून गाडीतून कसे सुखरूप जाता तेच मी पाहतो. मी घाबरून पैसे रोख नाहीतर चेकने देतो असे म्हणून निघून आलो. मी जयकुमार गोरे यांनी दिलेल्या धमकीला खूप घाबरलो असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांचे पीए बागल यांना दुपारी फोन करून कळविले की, मी 1 कोटी रुपये सध्या चेकने देऊ शकतो. त्यानंतर समजुतीचा करारनामा करून सातबाराची दप्तरी नोंद झाल्यानंतर उर्वरीत रक्कम देईन. त्यावर त्यांनी मला आमदारांशी बोलून सांगतो असे कळवल्याचे गोसावी यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांकडे गोसावी यांनी केलेल्या तक्रारीनुसार प्राथमिक तपास सुरू आहे. तापसानंतर काही आक्षेपार्ह आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे दुधे यांनी सांगितले. 

संबंधित लेख