ex mlc narendra patil got corporation from bjp | Sarkarnama

राष्ट्रवादीचे नरेंद्र भाजपच्या देवेंद्रांकडे; मिळवले वडिलांच्या नावाचे महामंडळ! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादीने दिलेल्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत महिनाभरापुर्वी संपून माजी आमदार बनलेले नरेंद्र पाटील यांनी अखेर भाजपशी संधान बांधले आहे. त्याबदल्यात त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळालेले आहे. 

पुणे: राष्ट्रवादीच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत महिनाभरापुर्वी संपून माजी आमदार बनलेले नरेंद्र पाटील यांनी अखेर भाजपशी संधान बांधले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबदल्यात त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना दिले आहे. 

गेल्यावर्षी मराठा आंदोलनाचे लोण राज्यभर पसरल्यानंतर भाजपने काही मराठा नेत्यांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यात नरेंद्र पाटील होते. त्यावेळी ते राष्ट्रवादीचे आमदार होते, मात्र मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास स्पष्ट होते. परिणामी भाजपकडून काही मिळेल, या भूमिकेतून नरेंद्र पाटलांचा भाजपशी संपर्क सुरु होता. भाजप त्यांना विधान परिषद देणार अशी चर्चा होती. मात्र काही दिवसानंतर ती चर्चा थांबली. 

दरम्यानच्या काळात मुंबईत माथाडीँच्या मेळाव्याला त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित केले होते. प्रत्यक्ष कार्यक्रमात फडणवीस आले नव्हते, त्यांनी मोबाईलवरुन भाषण केले होते. पुढील काही दिवसांत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना पाटील उपस्थित राहिले. यातून पक्ष सोडणार नसल्याचा संदेश ते देत होते. मात्र कोकण पदवीधर निवडणुकीच्यानिमित्ताने नरेंद्र पाटील भाजपच्याबाजूने ऍक्‍टिव्ह झाले. 

राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार निरंजन डावखरे यांच्या भाजपप्रवेशासाठी ते भाजप कार्यालयापर्यंत गेले होते. त्याचवेळी त्यांची दिशा स्पष्ट झाली होती. त्यानंतर काही दिवसांतही नरेंद्र पाटील यांची आमदारकीची मुदत संपली. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही आणि भाजपनेही विचार केला नाही.

त्यांना महामंडळ दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्याप्रमाणे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

संबंधित लेख