सनमडीकर 'मिल्ट्री'तच लिडर बनले, वसंतदादांनी त्यांना 'असेंब्ली'त पाठवले!

सनमडीकर 'मिल्ट्री'तच लिडर बनले, वसंतदादांनी त्यांना 'असेंब्ली'त पाठवले!

१९८५ सालची गोष्ट आहे. विधानसभा निवडणूक जवळ होती. एक दिवस आमच्या तालुक्यातील लोक वसंतदादा पाटील यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, 'आमच्या तालुक्यातील मिल्ट्रीवाला लोकांच्यासाठी काम करतोय. त्याला तिकीट द्या."

दादा त्यांना म्हणाले, 'त्या मिल्ट्रीवाल्याला माझ्याकडे घेऊन या.' मग मी दादांना नागेवाडीत भेटलो. तिथं माळावर उभे राहून दादांनी मला सांगितले, 'पोरा तू जा. तुझे तिकीट फायनल आहे. तयारीला लाग.' त्यानंतर मी निवडणुकीला उभा राहिलो आणि लोकांच्या प्रेमामुळे आमदार झालो."

भारतीय सैन्यदलात शिपाई, हवालदार, नायक या पदावर काम केलेले आणि १९८५ साली जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले माजी आमदार उमाजीराव सनमडीकर सांगत होते.

जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झालेला. सनमडीकर सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहचू शकले. त्यांचे वडील मरीआई देवीचे पुजारी होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर १९६२ साली सैन्यात दाखल झाले.

ते सांगतात,"मी सैन्यात गेलो. १९६५ सालच्या युद्धात मी होतो. त्यानंतर १९७१ च्या दरम्यान माझी निवड मुंबईला अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी झाली. नोकरीच्या काळात मला नायक, हवालदार या पदावर काम करता आले. तिथे कार्यरत असताना मी आमच्या सहकाऱ्यात प्रिय होतो. ज्या सैनिकांना जमीन नाही त्यांना त्यांच्या गावात जमीन मिळावी म्हणून मी अर्ज करायचो. नेतृत्वगुण माझ्याकडे होतेच. मी तिथं लीडर झालो होतो. मला सगळे लीडर मानत होते. १९७७ साली मी निवृत्त होऊन गावी आलो. लोकांची कामे करू लागलो.

गावातील लोकांनी मला ग्रामपंचायत निवडणुकीत उभा केले. मी निवडून आलो, उपसरपंच झालो. त्यानंतर १९७९ साली पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात सर्वात जास्त मतांनी निवडून आलो. मी पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात गेल. पंचायत समितीत येणाऱ्या प्रत्येक माणसाची मी कामे करायचो. मग याच लोकांना वाटू लागले 'याला आमदार करूया.' मग जत राखीव मतदारसंघातून मला उमेदवारी द्यावी म्हणून विजयसिंह डफळे राजे आणि तालुक्यातील लोकांनी वसंतदादा पाटील यांच्याकडे साकडे घातले. दादांनी मला उमेदवारी दिली आणि १९८५ साली मी आमदार झालो.

भारतीय सैन्यदलातील शिपाई ते आमदार असा माझा प्रवास झाला. १९८५,९० आणि २००४ साली असं तीन वेळा मी आमदार झालो. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मला महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली."असे सनमडीकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com