ex mla sadashivrao patil active in vishal patil campaign | Sarkarnama

सदाभाऊंनी संजयकाकांबरोबरचा पैरा संपवला; आता विशाल पाटलांसाठी 'बॅटिंग'!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी "जिथे तुम्ही कमी पडताय, तिथे माणसे जोडून देतो', असा शब्द दिला आहे. पुढील काळात आणखी काही लोक येतील. त्यांना बरोबर घेऊन काम करू, असे सदाशिवरावांनी सांगितले. 

विटा (सांगली) : चार वर्षांपासून कॉंग्रेसच्या कुंपणावर असलेल्या माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी आघाडीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विशाल पाटील यांची बॅट हातात घेतली आहे.

खानापूर तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सदाशिवराव पाटील म्हणाले, "विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माझी भूमिका ठरली होती; परंतु मी एकट्याने काम करण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका होती. त्यासाठी तालुक्‍यात विभागवार बैठका घेत कार्यकर्त्यांची मते आजमावत होतो. कार्यकर्त्यांत मतभिन्नता होती. भविष्यातील आपल्या वाटचालीचा विचार करावा लागणार होता. आम्ही सर्वांनी एकत्रित आणि ताकदीने विशाल पाटील यांना बळ देण्याचा निर्णय घेतला. आमचा कोणावर रोष नाही.'' 

ते म्हणाले, "लोकांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात लाट असल्याचे जाणवले. गतवेळी लोक ऐकायला तयार नव्हते. आता लोक बोलत नाहीत. देश आणि राज्यातील लोक परिस्थिती पाहून एकत्र येत आहेत. अशावेळी मागे काय झाले, याचा विचार करण्यापेक्षा पुढे जाताना सर्वांनी एकत्रित जायचे ठरविले आहे.''

कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील, राजेंद्र माने, सुशांत देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, सुशांत देवकर, दत्तात्रय चोथे, विशाल पाटील, राजेंद्र माने उपस्थित होते. 
 
गेल्या पाच वर्षांत खासदार संजय पाटील यांनी मदत केली, हे मान्य आहे. आम्ही आमच्या ताकदीने त्यांना लोकसभेला मदत केली होती. त्यामुळे आता पैरा हा विषय संपला आहे. एकदा पक्षाचा निर्णय झाल्यानंतर लाईन दोरीत काम होईल. सदाभाऊ हाच आमचा पक्ष आहे, असे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले. 

संबंधित लेख