ex mla sadashiv patils next move analysis | Sarkarnama

सोलापूर आणि आटपाडीच्या देशमुखांचे सांगणे विट्याचे पाटील कसे टाळतील? 

संपत मोरे 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सदाशिव पाटील यांनी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. खासदार संजय पाटील यांच्याशी असलेला त्यांचा राजकीय सलोखा आणि विधानसभेतील पराभवानंतर कॉंग्रेसवर असलेली त्यांची नाराजी यामुळे ते भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. त्या चर्चा सुरु झाल्यानंतर पाटील यांची समजूत काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. मात्र भाजपप्रवेशाची चर्चा थांबलेली नाही, उलट ती अधिक तीव्रतेने होवू लागली आहे. 

भाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील यांना एका कार्यक्रमात थेट भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले. याच कार्यक्रमात आटपाडीचे अमरसिंह देशमुख यांनीही सदाशिव पाटील यांचे सुपुत्र, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना उद्देशून मिश्‍कीलपणे "दादा, एकाला मिठीत घेऊन दुसऱ्याला डोळा मारायचे बंद करा' असे सांगितले.

विधानसभा निवडणुकीत पाटील आणि देशमुख एकमेकांच्या विरोधात लढले होते, त्यामुळे त्यांच्या टिप्पण्णीला महत्त्व आहे. या कार्यक्रमात सोलापूर आणि आटपाडीच्या देशमुखांनी सुरात सूर मिसळत विट्याच्या पाटलांना "भाजपवासी व्हा' असे आवाहन केले. त्यानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या पाटील यांच्या कार्यकर्त्यांचीही त्यांनी भाजपवासी व्हावे अशीच प्रतिक्रिया होती. 

काही दिवसांपूर्वी खासदार संजय पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे फलक सदाशिव पाटील यांच्या समर्थकांनी लावलेच, शिवाय भव्य सत्कार पाटील गटाकडून झाला. या सगळ्या घटना सदाशिव पाटील यांची भाजपशी असलेली दोस्तीचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. परवाच्या कार्यक्रमात आटपाडीच्या देशमुखांनी "आम्ही भाऊंचा हात धरायला तयार आहोत भाऊंनी आमचा हात धरावा, अशी साद घातली. या साद घालण्याला खूप महत्व आहे.

खानापूरच्या राजकारणात पाटील आणि देशमुख यांनी हातात हात घालून दोन निवडणुका जिंकल्या आहेत. 1995 साली सदाशिव पाटील यांनी राजेंद्र देशमुख यांच्या पाठीशी बळ उभे केले होते. त्या निवडणुकीत देशमुख यांचा विजय झाला होता. त्यानंतर 2004 मध्ये देशमुख यांनी पाटील यांना पाठिंबा दिला होता, तेव्हा पाटील विजयी झाले होते . 

2014 मध्ये मात्र पाटील आणि देशमुख यांची पाहिल्यांदाच मैदानावर लढत झाली. या लढतीत अनिल बाबर यांचा विजय झाला. पाटील यांना दुसऱ्या क्रमांकांची मते मिळाली, भाजपचे गोपीचंद पडळकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर अमरसिंह देशमुख चौथ्या क्रमांकावर गेले.

पाटील आणि देशमुख यांचा पैरा या निवडणुकीत थेट तुटला. 2009 च्या निवडणुकीत देशमुख यांनी बाबर यांना मदत करत सदाशिव पाटील याना विरोध केला होता. पण 2014 ला मात्र सरळसरळ एकेकाळचे पैंरेकरी समोरासमोर लढले होते, या सगळ्या राजकीय इतिहासानंतर आटपाडीच्या देशमुखांनी विट्यात येऊन पाटलांना हात हातात धरण्याचे आवाहन करणे, त्याला सोलापूरच्या देशमुखानीही दुजोरा देणे यावर सदाशिव पाटील यांनी प्रतिक्रिया न देता हा विषयावर मौन धारण करणे, याचा अर्थ स्पष्ट आहे.

या सगळ्या घटनाक्रमातून कॉंग्रेसच्या नेतेमंडळीवर नाराज असलेले आणि संजय पाटील यांच्या प्रेमात असलेले सदाशिव भाऊ भाजपवासी होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. तसे घडले आणि सदाशिव पाटील यांच्यासारखा प्रभावी नेता, तुफानी वक्ता भाजपकडे गेला तर खानापूरच्या कॉंग्रेसची दयनीय अवस्था होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख