EX MLA Kalyan Kale & EGS workers | Sarkarnama

माजी आमदार डॉ. कल्याण काळे रोहयो मजुरांच्या दिवाळी भेटीला गेले तर अधिकारी सुटीवर होते !

सरकारनामा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

विशेष म्हणजे रोहयोच्या कामावर मजूर हजर असतांना संबंधित अधिकारी मात्र सुटीवर होते.

औरंगाबादः कॉंग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हा कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी रोहयो मजुरांसोबत दिवाळी साजरी केली. फुलंब्री तालुक्‍यातील धानोरा गावात कामावर असलेल्या मजुरांना काळे यांनी पेढा भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी औरंगाबादेतील जनसंघर्ष यात्रे दरम्यान फुलंब्रीच्या सभेत माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची उमेदवारी जाहीर केली होती. तेव्हापासून काळेंचा उत्साह वाढला असून सगळा मतदारसंघ ते नव्या दमाने पिंजून काढतांना दिसत आहेत. मतदारसंघातील प्रतिस्पर्धी व विद्यमान आमदार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आगामी निवडणुकीत चीतपट देण्याचा काळे यांचा प्रयत्न आहे. 

सध्या सगळ्याच पक्षाच्या इच्छुकांनी दिवाळीचा मुर्हूत साधत मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठी घेत त्यांना शुभेच्छा देण्यावर भर दिला आहे. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम, शुभेच्छा ग्रिटींग आणि भेटवस्तू देत आजी-माजी लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 

डॉ. कल्याण काळे यांनी थेट मतदारसंघात सुरू असलेल्या राहयो कामावर जाऊन तिथे काम करणाऱ्या मजुरांना सुखद धक्का दिला. पेढे भरवत दिवाळीच्या शुभेच्छा देतांनाच त्यांनी फराळ आणि मिठाईचे बॉक्‍स देखील वाटले. विशेष म्हणजे रोहयोच्या कामावर मजूर हजर असतांना संबंधित अधिकारी मात्र सुटीवर होते.  त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे हे देखील उपस्थित होते. 

संबंधित लेख