ex mla anil rathod about balasaheb thackrey | Sarkarnama

फार्महाऊसमधून बाळासाहेब बाहेर आले, लाल दिव्याच्या गाडीतला मंत्री बघण्यासाठी!   

मुरलीधर कराळे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

एक सायंकाळ मला खूपच भावून गेली

नगर: ''बाळासाहेब ठाकरेंची आठवण अनेक प्रसंगांमुळे येत राहते. नगरचे काम घेवून गेल्यानंतर  ते आदबीने विचारपूस करीत. नगरवर माझे विशेष प्रेम आहे, असे म्हणून ते नगरचा गौरव करीत. त्यांच्या आठवणीतील एक सायंकाळ मला खूपच भावून गेली, ती मी जीवनात कधीच विसरू शकत नाही.''...माजी आमदार अनिल राठोड सांगत होते!

राठोड म्हणाले, एकदा मी मुंबईला कामानिमित्त गेलो होते. त्यावेळी मी अन्न व पुरवठा मंत्री होतो. मुंबईहून नगरला येताना साहेबांना भेटायचे होते. ते कर्जतच्या फार्म हाऊसवर होते. तेथे मी गेलो. साहेबांच्या पाया पडलो. ते म्हणाले, अरे भैय्या, कुठं निघालास. इतक्या उशिरा जावू नकोस. आज इथेच थांब. आरे बाबा, तू आता मंत्री झालास. जबाबदार आहेस. लाखो लोकांची जबाबदारी तुझ्यावर आहे. रात्रीअपरात्री फिरू नकोस. अशी आदबीने त्यांनी माझी विचारपूस केली. ती मला खूपच भावली. 

मला नगरला जाणे आवश्यक होते. असे त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणाले, ठिक आहे. माझा सर्वसामान्यातून आलेला मंत्री गाडीत बसताना कसा दिसतो, ते मला पहायचे आहे. चल मीही बाहेर येतो, असे म्हणून ते दारापर्यंत आले. मला गाडीत बसण्यास सांगितले. त्यावेळी गाडीला लाल दिवा असायचा. दिवा लावण्याच्या सूचना ड्रायव्हरला दिल्या. माझा मंत्री लाल दिव्याच्या गाडीत बसताना कसा दिसतो, हे त्यांचे बोल माझ्या कानात अजूनही गुंजत आहेत. 

संबंधित लेख