EX Minister Anil Deshmukh likes to visit his native place on Diwali | Sarkarnama

दिवाळी आली की, अजूनही आमची पावले गावाकडेच वळतात !

अनिल देशमुख ,माजी मंत्री
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा बहुतांश मुक्काम नागपुरात राहत असला तरी दिवाळी मात्र त्यांचे वडविहीरा या गावात साजरी होते.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्‍यातील वडविहिरा हे छोटेसे खेडे आहे. या गावात आमचा देशमुखांचा वाडा आहे. हा वाडा अद्यापही जुन्या ग्रामीण संस्कृतीशी जुळलेला आहे. त्यात शहरी संस्कृती व सिमेंटीकरणाचा रंग आलेला नाही. दिवाळीच्या दिवसात संपूर्ण देशमुख कुटुंबिय या गावातच दिवाळी साजरी करतात. 

 गावातच दिवाळी साजरी करण्याची ही प्रथा खूप वर्षांपासून आहे. महाविद्यालयीन जीवनात असतानाही दिवाळीच्या सुटट्या लागल्यानंतर पहिल्यांदा गावाला जाणारी एस.टी. पकडायचो. ते दिवस खूप चांगले होते. दिवाळीत गावाला जाण्यासारखे दुसरे सुख नव्हते.

शेतात पीक डोलत असे . बरेच धान्य  वाड्यात कुठे कुठे पोत्यांमध्ये भरून ठेवलेले राहत होते. घराच्या गोठ्यात गायी, बैल रवंथ करीत असत .  गावात तेव्हा दिवाळीत गायीची पूजा करायची. पोळ्याला जसे बैलाला आपण सजवितो तसेच आम्ही दिवाळीत गायीला सजवित होतो.

गायीला पाण्याने धुऊन काढणे, तिला रंग लावणे, तिच्या शिंगांना बेगड लावणे, तिच्या गळ्यात कवड्या बांधणे, हा सारा प्रकार खूप आनंद देणारा व जीवन समृद्ध करणारा अनुभव होता.

आता काळानुसार बरेच बदल झाले. गावातही आता शहरी संस्कृतीचा शिरकाव झाला. गावातील पशुधनाची संख्या कमी झाली. अनेकांनी गाव सोडून शहरात बस्तान टाकले. त्यामुळे आता ती मजा नाही.

परंतु अजूनही आम्ही संपूर्ण कुटुंबिय वडविहिरा येथेच जातो. दिवाळीत गावातील लोक वाड्यावर येतात. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. आम्ही गावातील मोठ्या व्यक्तींच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतो.

काही जण आपल्या अडचणी सांगतात. शेतीमध्ये असलेल्या समस्या सांगतात. दिवाळी हा सगेसोयऱ्यांना व गावातील लोकांशी भेटण्याचा हा सण आहे. त्यामुळे दिवाळी आली की अजूनही आमची पावले आपसूक गावाकडे वळतात.

(शब्दांकन- सुरेश भुसारी) 
 

संबंधित लेख