गोवा: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या बंडाला  वेलिंगकरांचे बळ !

आता कॉंग्रेसच्या दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून या संघर्षाला उघड वाचा फुटली आहे.
goa-parrikar- Parsekar -welingkar.
goa-parrikar- Parsekar -welingkar.

पणजी : गोव्यात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उघडपणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. विधानसभेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजपच्या जागा २१ विरून १३वर आल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्यात नेहमीच संघर्ष होता. आता कॉंग्रेसच्या दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून या संघर्षाला उघड   वाचा फुटली आहे.

पार्सेकर यांना गोव्यात भाजप पासून दूर गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा पाठिंबा आहे. या स्वयंसेवकांचे नेतृत्व माजी प्रांत संघचालक सुभाष वेलींगकर करत असून भाजपची गोव्यातील उभारणी त्यांनीच केली आहे. आता त्यांनी गोवा सुरक्षा मंच नावाचा पक्ष स्थापन केला असून त्या पक्षाची कवाडे भाजपमधील नाराज नेत्यांना खुली असल्याचे सांगितले आहे. पार्सेकर यांच्या भूमिकेला भाजप राज्य गाभा समितीचे सदस्य माजी मंत्री दयानंद मांद्रेकर आणि माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे भाजपसमोरील कटकटी वाढल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपमध्ये आलेल्या दयानंद सोपटे यांचे नाव न घेता त्यांच्याविरोधात मोहिम सुरु केली आहे. चला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण सगळेजण गोव्याच्या या पवित्र भूमीतून पक्षबदलू, स्वार्थी. लाचार, विकावू व ढोंगी राजकारण्यांना उघडे पाडून गोव्यात राजकीय आदर्श निर्माण करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन पार्फेसेकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून केले आहे.

 हा संकल्प उत्तरेतून पेडणेकराच्या स्वाभीमानाचा हुंकार दाखवून मांद्रेतून सुरु करुया असेही त्यांनी म्हटले आहे. गेले तीन दिवस तिखट प्रतिक्रीया देणाऱ्या पार्सेकर यांचा पुढील प्रवास त्यामुळे भाजपसमोर कटकटी निर्माण करणारा ठरणार आहे, असे दिसते. पार्सेकर यांना समाज माध्यमातून मिळणारा प्रतिसाद पाहता लोकसभेची वा विधानसभेची पोट निवडणूक बरीच जड जाणार असे दिसते.

या साऱ्याचा फायदा भाजपमधील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रावादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड यांनी घेणे सुरु केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना काल मगोचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई स्वतंत्रपणे भेटले.ढवळीकर यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या नेतृत्वबदलाची गरज नाही, तात्पुरती व्यवस्था करायची असल्यास घटक पक्षांचा त्यासाठी विचार करावा असे सुचवले आहे. 

सरदेसाई यांनी नेतृत्व बदलावर कायम. तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. या परस्परविरोधी मागण्या आणि गोव्यातील भाजपमधील अस्वस्थता पाहता नेतृत्वबदलाच्या प्रश्नावर कोणताही निर्णय शहा यांनी घेतला नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक तयारीची कामे असतानाच काल  शहा यांनी केवळ दोन खासदार संख्या असलेल्या गोव्याच्या राजकारणासाठी अर्धा दिवस  दिला तरीही त्यांना गुंता सुटलेला नाही.

गोवा मंत्रिमंडळातून अॅड फ्रांसिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना वगळल्यानंतर भाजपसमोर निर्माण झालेला पेच संपता संपेना असा वाढत चालला आहे. पूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या राजकारणात लक्ष घालत होते, अाता  खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लक्ष घालत असूनही, त्यांनाही हा गुंता सोडवता आलेला नाही. भाजप चौफेर कोंडीत सापडला असून त्यामुळे तूर्त गोव्यात नेतृत्वबदल नको अशी बोटचेपी भूमिका भाजपला घ्यावी लागली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये महिनाभर होते. ते तेथे असताना मंत्रिमंडळात बदल करण्यात आला. नीलेश काब्राल आणि मिलिंद नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर  इतर अनेकांच्या आशा आकांक्षांना पालवी फुटली. उपसभापती मायकल लोबो यांनी जाहीरपणे हा विषय मांडला होता. हळदोण्याचे आमदार ग्लेन टिकलो यांचे समर्थकही एकवटले होते. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांना मंत्रिपद द्यावी असा सूर डिचोलीत उमटला होता. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होईल असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांना द्यावे लागले होते. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यानी याच सरकारमध्ये लोबो यांना स्थान मिळेल असे सांगून राजकीय उस्तुकता ताणली होती.

मंत्रिमंडळ बदलानंतर सुरु झालेली राजकीय वावटळ थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच अचानकपणे मुख्यमंत्री पर्रीकर गोव्यात आले. ते आल्यावर पुन्हा नेतृत्व बदलाची चर्चा जोर धरू लागली. रक्तदाबाच्या दुखण्याने डोके वर काढल्याने त्यांनी स्ट्रेचरवरून दिल्ली ते गोवा प्रवास केला. मात्र त्यांची प्रकृती अतिशय खालावल्याचा अर्थ काढून नेतृत्व बदलासाठी हालचाली आपसूकपणे सुरु करण्यात आल्या. 

कॉंग्रेसचे सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यासोबत दिल्लीत गेलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली. विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत हेही तातडीने दिल्लीला गेल्याने त्यांच्या नावाची चर्चाही सुरु झाली. शहा यांनी आज सरदेसाई व ढवळीकर यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. मात्र या चर्चेनंतर गुंता सुटण्याऐवजी वाढल्याचीच माहिती मिळाली आहे. त्यामुळे तूर्त नेतृत्वबदल नाही या निर्णयाप्रत भाजप आल्याचे समजते
 
कॉंग्रेसचा कांदोळीत डेरा
कॉंग्रेसने आपले उर्वरीत आमदार फुटू नयेत यासाठी काळजी घेणे सुरु केले आहे. कॉंग्रेसचे राज्य प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यानी राज्यात तळ ठोकला असून आमदारांना कांदोळी येथे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्या हॉटेलमध्ये एकत्रित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. काल रात्रीपासून हे आमदार हॉटेलमध्ये आहेत. दसरोत्सवासाठी काही जण आज आपल्या मतदारसंघात जाऊन परत आले. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सहजपणे आम्ही एकत्र भेटण्याासाठी जमलो आहोत असे सांगितले. मात्र गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेसचे चार आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितल्यानंतर कॉंग्रेसकडून ही खबरदारी घेण्यात आल्याचे दिसते.

वेलिंगकर यांची भूमिका
गोवा सुरक्षा मंच या पक्षाचे मार्गदर्शक सुभाष वेलींगकर यांचे या राजकीय घडामोडींवर लक्ष आहे. भाजपची बांधणी करताना त्यांचे मार्गदर्शन संघचालक म्हणून लाभले होते. ते सक्रीय राजकारणात येतील की नाही याबाबत काही निर्णय झालेला नाही. शनिवारी (ता.20) पर्वरी येथे भारतीय भाषा सुरक्षा मंचाची बैठक आहे. तेथे वेलिंगकर यांनी राजकारणात यावे याविषयी आग्रह करणारी चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमधील दुखावलेल्या नेत्यांना मंचाने आपले दरवाजे विनाअट प्रवेशासाठी खुले केल्याने राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com