Established leaders are surprised by the response raju shetty receiving | Sarkarnama

स्वाभिमानीच्या गर्दीचा प्रस्थापितांना धसका ?

अरूण जैन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

निवडणूक जेमतेम काही महिन्यांनी असल्याने ज्यांना भाडोत्री गर्दीही मिळत नाही अशावेळी स्वाभिमानीसोबत स्वयंस्फूर्त आलेल्या गर्दीने प्रस्थापितांच्या पाचावर धारण बसली आहे.

बुलडाणा :   नुकतेच बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोयाबीन-कापूस (दुष्काळ) परिषद झाली. मात्र जिल्ह्यात प्रस्थापितांच्या तुलनेत लहान असलेल्या स्वाभिमानीच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी इतरांना चकीतच करणारी होती.

विदर्भात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चांगले नेटवर्क आहे. रविकांत तुपकरांनी यासाठी परीश्रमपूर्वक प्रयत्नही केलेले आहेत. त्यामुळेच त्यांनी ही परिषद बुलडाण्यात ठेवली. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम, त्याच दिवशी औरंगाबादेत भारिप व एमआयएम चा मोठा  कार्यक्रम  व इतर पक्षांचे कार्यक्रम .

यामुळे परिषद तर ठेवली पण ज्यांच्यासाठी ही परिषद ठेवली तो शेतकरी-शेतमजूर हातची कामे सोडून कसा येणार? शिवाय गाड्या करून लोकांना आणण्याची आर्थिक कुवत ना पक्षाकडे- ना नेत्याकडे. 

अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाला सोयाबीन व कापूस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कारण या नगदी पिकावरच आगामी दसरा दिवाळी साजरी करण्याचे नियोजन असते. पण  जिल्ह्यातील कोरडवाहू शेतक-यांना पावसाने दगा दिला.

उरलीसुरली कसर महावितरणने ऐनवेळी डीपीसाठी पैसे भरण्याची अट घालून शेतक-याची अडवणूक करण्याची भूमिका घेतली. या सर्व परिस्थितीने त्यांची केलेली कोंडी खूप मोठी आहे. त्यावर या परिषदेत फूंकर घातली   झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारचे डोळे उघडतील या अपेक्षेने शेतक-यांनी कार्यक्रमाला तोबा गर्दी केली.  

कारण खासदार राजू शेट्टींनी केलेल्या स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या धसक्यामुळे उसाला दरवाढ मिळते. दूध दराचे आंदोलन केल्यामुळे भाववाढ होते. मग आपल्या कापूस व सोयाबीनलाही दरवाढ मिळेल, नुकसानभरपाई मिळेल या आशेवर शेतकरी आला.

राजकिय दृष्टीने विचार करणारांच्या उरात धडकी भरविणारीच ही गर्दी होती. त्यात निवडणूक जेमतेम काही महिन्यांनी असल्याने ज्यांना भाडोत्री गर्दीही मिळत नाही अशावेळी स्वाभिमानीसोबत स्वयंस्फूर्त आलेल्या गर्दीने प्रस्थापितांच्या पाचावर धारण बसली आहे. एवढे निश्चित!

संबंधित लेख