as elections are nearing Modi remembers Advani's birthday ! | Sarkarnama

नरेंद्र मोदी यांना झाली लालकृष्ण अडवाणींची आठवण !

सरकारनामा
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव भाजपतर्फे पुढे येईल असे वाटत असताना त्यांना डावलले गेले . 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. आज अडवाणी यांचा ९१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना वाकून अभिवादन केले  आणि फुले  देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

  
एकेकाळी गुरु आणि मेंटॉर असलेल्या लालकृष्ण अडवाणी  आणि  नरेंद्र मोदी यांचे संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत . लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे  शिल्पकार म्हणून नरेंद्र मोदींकडे पहिले जात असे . माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातमधील दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळण्याचा जाहीर सल्ला दिला तेंव्हा मोदींचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते . त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांची भक्कम पाठराखण केली होती . 

परंतु २०१३ नंतर या दोन नेत्यांतील नात्यात दुरावा निर्माण झाला . लालकृष्ण  अडवाणी यांना भाजपमध्ये ज्या पद्धतीने बाजूला करण्यात आले त्याला आरएसएस आणि नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत असे मानले जाते .  २०१४ च्या विजया नंतर अडवाणी यांना भारतीय जनता पक्षाकडून सन्मानाची वागणूक मिळालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून ते राजकीयदृष्ट्या अडगळीत पडलेले होते . राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव भाजपतर्फे पुढे येईल असे वाटत असताना त्यांना डावलले गेले . 

 पण यावर्षी त्यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून मोदींनी त्यांची भेट घेतली. ही  भेट आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा  आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण झाल्याचे बोलले जात आहे . 

नरेंद्र मोदींनी या भेटीबाबत ट्विटही केले आहे. त्यामध्ये त्यांनी "भारतीय राजकारणात अडवाणी यांचा मोठा प्रभाव होता.त्यांचे निर्णय दूरगामी आणि लोककल्याणकारी होते. भारताच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात जे  निर्णय झाले ते लोकाभिमुख आणि दूरदृष्टी ठेवून घेतलेले होते. "असं म्हटलं आहे.

 

 

संबंधित लेख