elect president unopposed -Athwale | Sarkarnama

राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध करावी : आठवले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 जून 2017

केंद्र सरकारने तीन वर्षात सर्व सामान्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे दलित समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदासाठी संधी दिलेली आहे. यामुळे दलित समाजात आनंदाचे वातावरण आहे, असे आठवले यांनी सांगितले

पुणे : एनडीएने राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणुन भाजपचे दलित नेते आणि बिहारचे विद्यमान राज्यपाल रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हा क्रांतीकारी निर्णय आहे. दलित व्यक्ती राष्ट्रपती होत असल्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी उमेदवार देऊ नये. ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

के. आर. नारायणन यांच्यानंतर दुस-यांदा दलित समाजाला राष्ट्रपती पदासाठी न्याय मिळाला आहे. यामुळे केंद्र सरकार आरक्षण, संविधान आणि दलित विरोधी असल्याचा प्रचार करणा-या विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी केले आहे. हा आजपर्यंतचा क्रांतिकारी निर्णय असून या निर्णयाचे स्वागत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी आठवले पुढे म्हणाले की एनडीए चा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेसह सर्व पक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे. उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून ते देखील उमेदवारास पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांचे तोंड बंद!

रिपाइंने भाजप आणि सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा विरोधकांनी टिका केली होती. केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाले. इंदु मिलमधील स्मारक, लंडन मधील घर, भीम एप आधारला जोडले असे अनेक निर्णय घेतले. आणि आता दलित असलेेले कोविंद यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे निवड योग्य असुन मोदी आणि शहांनी विरोधकांचे तोंड बंद केले आहे, असा टोलाही केंद्रीयमंत्री आठवले यांनी यावेळी लगावला.
 
 

संबंधित लेख