Eknath pawar avoids confrontation | Sarkarnama

एकनाथ पवारांची डिप्लोमॅटिक उत्तरे़; आक्रमक भाषेला आवर

उत्तम कुटे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या वादाचे वातावरण आहे. खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध एकनाथ पवार असा सामना रंगलेला असतानाच राष्ट्रवादीच्या वाघेरे यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. या टिकेवर पवार यांनी मात्र संयम बाळगला असून डिप्लोमॅटिक उत्तरे देऊन विरोधकांना अंगावर घेण्याचे आज टाळले 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ता गेल्याच्या नैराश्‍यातूनच राष्ट्रवादी भाजपवर टीका करीत आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कालच्या टिकेला दिले.

भाजपने बेस्ट सिटी पिंपरी-चिंचवडची सहा महिन्यांतच वाट लावली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी काल केला होता. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्याऐवजी एकनाथ पवार यांची उंची नसल्याची तोफही त्यांनी डागली होती. त्याला आज भाजपच्या पवार यांनी उत्तर दिले.मात्र, त्यांचा नेहमीचा आवेश यावेळी दिसला नाही. तसेच आक्रमक व शिवराळ भाषाही त्यांनी आवर्जून टाळली. 

वाघेरे यांच्या अत्यंत कडवट टीकेला एकनाथ पवार यांनी सौम्य भाषेत उत्तर दिले. ते म्हणाले,""शरद पवार व अजित पवार यांच्यावर मी काय प्रथमच टीका केलेली नाही. त्यांच्याविरुद्ध गेली 25 वर्षे मी आंदोलन करीत आहे. परंतु आताच केलेली टीका वाघेरे यांना कशी बोचली.सत्ता गेल्याने नैराश्‍य आल्यानेच ती त्यांना दिसली असावी'' 

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळे निवडून आल्याच्या टीकेसंदर्भातही त्यांनी मुत्सद्दीपणे वाद होणार नाही असे उत्तर एकनाथ पवार यांनी दिले. ते भाजपचे शहराध्यक्ष व पक्षाचे शहरातील दुसरे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. तर, लांडगे हे जगताप यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जातात. सध्या या दोघांत मंत्रिपदावरूनही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे लांडगेसह पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी माझ्या नगरसेवक होण्यास कारणीभूत आहेत, असे डिप्लोमॅटीक उत्तर एकनाथ पवार यांनी दिली.

भाजपमधील प्रतिस्पर्धी गट नाराज होणार नाही व आपलाही गट संतुष्ट राहील याची काळजी त्यांनी घेतली. शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्यावर केलेली जहरी टीका व आरोपासंदर्भात,मात्र ते काहीच बोलले नाही. बारणे यांच्यावरच ते तुटून पडतील अशी शक्यता होती. मात्र, शिवसेनेवर बाण मारणे थांबविल्याचे दिसून आले.
 

संबंधित लेख