एकनाथ खडसे यांची दिल्लीतून मोर्चेबांधणी

राज्यातील वजनदार भाजप नेत्यांमध्ये नाव असलेले एकनाथ खडसे हे पक्षाच्या मुख्य निर्णयप्रक्रियेपासून बाजूला सारले गेले होते. पुन्हा एकदा पक्षातील स्थान बळकट करण्याच्यादृष्टीने खडसे यांनी प्रयत्न चालविले आहेत.
एकनाथ खडसे यांची दिल्लीतून मोर्चेबांधणी

मुंबई : जमिन गैरव्यवहारप्रकरणात अडचणीत आलेले माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी आता दिल्लीतून विनंतीवारी सुरु केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. राष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे गुरुवारी विजयी झाले. या विजयाचा दिल्लीत भाजपाच्या नेत्यांवर आनंद असताना, खडसे यांनी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. काल सांयकाळी ते अमित शहा यांनाही भेटल्याचे समजते.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात 2016 मध्ये याचिका दाखल केली होती. एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय पदाचा वापर करुन नातेवाईकांच्या नावावर जमिनी बळकविल्या असल्याचा आरोप याचिकेतून केला होता. माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आली का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे केली आहे. तसेच यासंदर्भात काय चौकशी केली, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्धारे राज्य सरकारने न्यायालयात सादर करायची आहे.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी चर्चा होती. त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या नावाला दिल्ली नेतृत्वाने हिरवा कंदिल दिल्याचे बोलले जात होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या चौकशी संदर्भातील याचिकेमुळे खडसे यांची अडचणीत आले आहेत. त्यांचे पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागून त्यांचे राजकीय पुर्नवसन केले जाईल की नाही, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. दिल्ली येथील अकबर रोडवरील अमित शाह यांच्या बंगल्यावर खडसे यांनी काल सांयकाळी भेट दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारकडून खडसे यांना वाचविले जाणार की, त्यांच्याविरोधात चौकशी करण्यासंदर्भात अनुमती देणार हे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होईल. मात्र, आपल्याविरोधात राजकीय सुडबुद्धीने आरोप करण्यात आले असल्याचा दावा खडसे यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असताना, खडसे हे नेहमी ज्येष्ठतेनुसार बोलत असत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना नमते घ्यावे लागत होते. पुणे येथील भोसरी एमआयडीसी जागा विक्रीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत खडसे यांना गेल्या जुन 2016 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता.

राज्यातील वजनदार भाजप नेत्यांमध्ये नाव असलेले एकनाथ खडसे हे पक्षाच्या मुख्य निर्णयप्रक्रियेपासून बाजूला सारले गेले होते. पुन्हा एकदा पक्षातील स्थान बळकट करण्याच्यादृष्टीने खडसे यांनी प्रयत्न चालविले आहेत. अनुभव आणि वयाने ज्युनिअर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करण्यापेक्षा खडसे यांनी दिल्ली नेतृत्वाकडे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत दाद मागितली असल्याचे भाजप वर्तुळात चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com