Eknath Khadse on injustice about chief ministership | Sarkarnama

उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री देण्याबाबत सातत्याने अन्याय - एकनाथ खडसे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 मार्च 2018


कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, बाजार समितीचे माजी सभापती प्रसाद हिरे यांच्या सत्कार समारंभात एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रावर विकास आणि मुख्यमंत्रीपदाबाबत कसा अन्याय झाला हे सांगून आपले  मुख्यमंत्रीपद हुकले म्हणजे उत्तर महाराष्ट्रावर अन्याय झाला हे श्रोत्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला . तसेच खडसे यांनी आपल्याला  काँग्रेस नेत्यांबरोबर व्यासपीठावर हजर  राहणे चालते हे पुन्हा दाखवून दिले . 

मालेगाव :" उत्तर महाराष्ट्रावर आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत सातत्याने अन्याय केला. विकासालाही हाच निकष लागू आहे. खान्देशातील हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून संघर्ष करावा- एकत्र यावे ,"असे आवाहन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.

येथील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, बाजार समितीचे माजी सभापती प्रसाद हिरे यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भायगाव रस्त्यावरील राजीव गांधी तंत्रशिक्षण संकुलाच्या प्रांगणातील अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

 श्री. खडसे म्हणाले, " कर्मवीर भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब चौधरी, प्रतिभाताई पाटील, रोहिदास पाटील व बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. मुख्यमंत्री पद व विकासाच्या बाबतीत तेच झाले. नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रात काय असा सवाल करतांनाच आम्हाला रोजगार उद्योग नको आहे का? मॅग्नेटीक महाराष्ट्रात हजारो कोटीची गुंतवणूक झाली. मात्र उत्तर महाराष्ट्राला त्याचा लाभ होणार नसल्याचे तर आवाज उठवू. "

 शेतकऱ्यांसाठी व पाण्यासाठी आपण सतत संघर्ष केला, असे सांगून खडसे पुढे म्हणाले ," आपल्या हक्काचे पाणी कोणी पळवत असेल तर सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येत संघर्ष केला पाहिजे. नार-पार व प्रसंगी कोकणातले पाणी एकडे अाणले पाहिजे. आजवर आम्ही जे मिळविले ते कष्टाने मिळविले आहे. विदर्भासाठी गडकरी, फडणवीस भांडतात. उत्तर महाराष्ट्रातही ही भावना जागली पाहिजे. ३० हजार कोटीची कर्जमाफी करुनही शेतकरी सरकारचे कौतुक करत नाही.शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवावेत. श्री. हिरे सर्वगुण संपन्न व विविध क्षेत्रात काम करणारे नेतृत्व आहे. त्यांना आगामी काळात चांगल्या संधी आहेत."

आमदार तांबे म्हणाले, "सत्तारुढ शासन मुठभर लोकांचे हित पाहत आहे. निवडणुका जिंकण्याचे एक तंत्र निर्माण झाले आहे. सर्वसामान्य माणूस व कामगार त्यात हरवला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. "

यावेळी राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, हेमलता पाटील आदींची भाषणे झाली. केवळ हिरे,चंद्रशेखर शेवाळे, अमोल निकम, शकील भारती आदींनी स्वागत, सुत्रसंचालन व आभार मानले. यावेळी श्री.खडसे, श्री.भुसे, श्री.कांबळे यांच्या हस्ते प्रसाद हिरे यांचा सत्कार व ‘सर्वसामान्यांचे बापू’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्रीकांत वाघ यांनी पुस्तकाबद्दलची माहिती सांगितली.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अखील भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, समितीचे अध्यक्ष हरिलाल अस्मर, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार अनिल आहेर, संजय चव्हाण, जगन्नाथ धात्रक, दिलीप बोरसे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपसभापती राघो अहिरे, उपमहापौर सखाराम घोडके आदी व्यासपीठावर होते.

संबंधित लेख