Eknath Khadse Alleges about Maharashtra Minister | Sarkarnama

दमानिया प्यादे, माझ्या बदनामीचा मास्टर माईंड हा सरकारातील मंत्री : एकनाथ खडसे 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 13 जून 2018

अंजली दमानिया हे केवळ एक प्यादे आहे, मला बदनाम करण्यामागचा मास्टरमाईंड राज्यातील सरकारातीलच एक मंत्री आहे. त्यांना उघडपाडल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तो कितीही मोठा असला तरी त्याच्या विरुध्द कायदेशीर लढाई लढेन, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

भुसावळ : अंजली दमानिया हे केवळ एक प्यादे आहे, मला बदनाम करण्यामागचा मास्टरमाईंड राज्यातील सरकारातीलच एक मंत्री आहे. त्यांना उघडपाडल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तो कितीही मोठा असला तरी त्याच्या विरुध्द कायदेशीर लढाई लढेन, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

भुसावळ येथे भाजपचे प्रा. सुनिल नेवे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खडसे म्हणाले, ''माझ्या संपत्तीची चौकशी करण्यासंदर्भात दमानिया यांनी चोपडा अर्बन सहकारी बँकेचा माझ्या नावे असलेला नऊ कोटी पन्नास हजार रुपयाचा व दहा लाखाचा चेक बनावट असल्याचे सिध्द झाले आहे. बँक अवसायनात गेलेली असल्याने रिझर्व्ह बॅंकेने एक हजार रुपयाच्या वर व्यवहार करण्याला बॅंकेला निर्बंध घातलेले आहे. कदाचित ते चेक खरे असते तर माझ्यावरच गुन्हा दाखल होऊन मलाच तुरुंगात जाण्याची वेळ आली असती. प्रत्यक्षात हे चेक बनावट होते. विशेष म्हणजे न्यायालयासही दमानिया व टिमने आम्ही खडसे यांच्या विरोधात सादर केलेले पुरावे सत्य असल्याचे प्रतिज्ञापत्राव्दारे सांगितले होते."

ते पुढे म्हणाले, "याबाबत तत्कालीन पोलीस अधिक्षक सुपेकर यांनीही चेक बनावट असल्याचे एल.सी. बी. च्या तपासाअंती सांगितले होते. तरीही गुन्हा दाखल होत नव्हता. याबाबच्या सर्टिफाईड कॉप्या दीड महिन्यापूर्वी देऊनही मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. सध्याच्या जिल्हा पोलिस अधिक्षकांनाही पोलीस याकामी टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले. मात्र तेच कोणाच्या तरी दबावात काम करीत असल्याचे जाणवले. शेवटी मुक्ताईनगर न्यायालयात हे प्रकरण दाखल केले त्याची सुनावणी होऊन न्यायालयाने पोलीसांना संबधितांविरुध्द एफआयआर दाखल करण्यास सांगितले असुन त्याची चौकशी करुन चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीसात अंजली दमानिया, गजानन मालपुरे आदीसह सहा जणांविरुध्द एफआयआर दाखल झाला आहे." यात जी कलमे लावण्यात आली आहे त्यानुसार सात वर्षा पासुन ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत, असेही खडसे म्हणाले. 

माझ्या बदनामीमागे मंत्री 
राजकारणात 40 वर्षात माझ्यावर एकही आरोप लावण्यात आला नाही. असे सांगून ते म्हणाले, "दोन वर्षात मला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले. समाजात मला बदनाम करुन मंत्रीमंडळातून राजीनामा देण्याइतपत परिस्थिती निर्माण करण्यात आली. समाजात मी भ्रष्टाचारी, नालायक अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला खुप मनःस्ताप झाला. या प्रकारात अजंली दमानिया हे केवळ प्यादे आहे. या मागे राज्यातील मंत्री असल्याचे कल्पना इनामदार यांनी म्हटले आहे. त्यानुसारच निश्‍चितच मी मंत्रीमंडळातून बाहेर गेल्यावर कोणाला तरी लाभ होणार असेल अश्‍या लाभार्थ्यांचा मी शोध घेणार आहे. ज्यांनी मला त्रास दिला त्याचे नाव बाहेर येईलच. ते नाव मी आत्ताच सांगू शकत नाही." 

तीन वेळा चौकशी
आरोप झाल्यापासून लाचलुचपत विभागाने माझी तीन वेळा तर कुटgxबाची तीन वेळा सर्व अंगाने चौकशी केली आहे. त्यात काहीही चुकीचे आढळुन आलेले नाही. असे असुनही केवळ मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले. शेवटी सत्य हे सत्यच असते, असे खडसे म्हणाले.

अंजली दमानिया

संबंधित लेख