Ekanath Khadse Maharashtra Influential Leader in Sarkarnama Diwali Aan Interview | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मीच अनेकांचा राजकारणातला गाॅडफादर - एकनाथ खडसे

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

देशभरातील विरोधक एकत्र आले तरी केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल, असा विश्‍वास आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्रातले प्रभावी नेतृत्व असलेले माजी महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारनामा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केला

जळगाव : देशभरातील विरोधक एकत्र आले तरी केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल, असा विश्‍वास आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. 'सरकारनामा'च्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना व निर्णयांबद्दल भूमिका मांडली. चाळीस वर्षांनंतर मीच आता अनेकांचा राजकारणातला 'गाॅडफादर' बनलो आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सरकारनामा फेसबुक लाइव्ह द्वारे आज मनमोकळा संवाद साधला सकाळच्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांना बोलते केले. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी - 

प्रश्‍न : आपल्या सरकारविरोधात सर्व स्तरातून असंतोष व्यक्त होताना दिसतो? 
खडसे : केंद्र व राज्य सरकारने गेल्या साडेचार वर्षांत खूप चांगले निर्णय घेतले. राज्य सरकारने कर्जमाफीची योजना आणली, 14 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, ही वस्तुस्थिती आहे. बोंडअळीला अनुदान, मुख्यमंत्री व पंतप्रधान पेयजल योजना अशा अनेक चांगल्या योजना राबविल्या. मात्र, सरकारचे हे निर्णय-योजना आम्ही जनतेपर्यंत पोचविण्यात कुठेतरी कमी पडलो. 

प्रश्‍न : खानदेश विकासाच्या बाबतीत मागे पडला का? 
खडसे : मी मंत्री असताना खानदेशासाठी अनेक प्रकल्प मंजूर केले. राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करुन ते जळगावात सुरु करणे, पशुवैद्यकीय महाविद्यालय, हॉर्टिकल्चर कॉलेज, चाळीसगाव येथे लिंबूवर्गीय संशोधन केंद्र अशा अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. दुर्दैवाने यातील काही प्रकल्प थंडबस्त्यात आहेत, तर काहींमध्ये कुठलीही प्रगती नाही. हे सर्व प्रकल्प झाले असते तर खानदेशाचे चित्र वेगळे दिसले असते. 

प्रश्‍न : सिंचन प्रकल्पांबाबत आपण काय सांगाल? 
खडसे : आजही खानदेश, उत्तर महाराष्ट्रात अनेक सिंचन योजना अपूर्ण आहेत. सारंगखेडा, प्रकाशा बॅरेज झाले आहे, मात्र त्यातून पाणी मिळण्याची सोय नाही. शेळगाव, पाडळसरे, वरखेड-लोंढे यांचीही कामे पूर्ण झालेली नाहीत. आमच्या सरकारच्या कार्यकाळात ही सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. मंत्र्यांना मी दोष देणार नाही, मात्र तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प रखडले. परंतु, त्यामुळे खानदेश विकासाच्या बाबतीत दोन पावले मागे राहिला. 

प्रश्‍न : राजकारणात आपला गॉडफादर कोण? 
खडसे : पक्षात चाळीस वर्षे सेवा केल्यानंतर या स्थितीत मीच आता अनेकांचा गॉडफादर झालो आहे. त्यामुळे आपला गॉडफादर कुणी नाही. असे असले तरी ज्यावेळी मी साधा कार्यकर्ता होतो, त्यावेळी 1990मध्ये माझी तयारी नसताना प्रमोद महाजनांनी मला उमेदवारी दिली. महाजनांसह गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. दुर्दैवाने महाजन, मुंडे यांच्यासारखे शब्द पाळणार नेते आज माझ्यासोबत नाही, याची खंत वाटते. आज मुंडे हयात असते तर राज्यातील राजकारणाचे चित्र वेगळे दिसले असते. 

प्रश्‍न : विरोधकांवर आरोप करुन आपण सत्तेत आलात, नंतर या आरोपांचे काय झाले? 
खडसे : 2014च्या निवडणुकीसाठी आम्ही चांगली तयारी केली. त्यावेळच्या सत्तेतील मंत्री, नेत्यांची प्रकरणे आपण पुराव्यांसह समोर आणलीत. कागदपत्रे घेऊन माझ्यासह देवेंद्र फडणवीस यांनीही ही प्रकरणे लावून धरली. जवळपास 114 प्रकरणांबाबत आम्ही सेंट्रल व्हिजीलन्स, सीबीआय, राज्यपाल, राष्ट्रपतींकडे तक्रारी केल्या. त्यातील 52 तक्रारींमध्ये चौकशी होऊन तथ्य आढळून आले असून त्यातील दोषींवर कारवाईबाबत आता आपण पुन्हा मुख्यमंत्र्यांना विचारणार आहोत. या प्रकरणांचा यापुढेही पाठपुरावा केला जाईल. 

प्रश्‍न : येत्या लोकसभा निवडणुकीकडे आपण कसे बघता? 
खडसे : मोदी सरकारविरोधात वातावरण असल्याचे केवळ विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. मोदी सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले, त्याचे दूरगामी चांगले परिणाम दिसून येणार आहेत. शिवाय, मोदींसारख्या कणखर आणि धाडसी नेतृत्वाला पर्यायही नाही. देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आलेत तरी काही फरक पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वोच्चस्थानी राहून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत येईल. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #सरकारनामा #SarkarnamaDiwali

मुलाखतीचे आधीचे भाग - 

पक्ष सोडणार नाही, पण विधानसभेत न्याय मागणार : एकनाथ खडसे 

युती तोडण्याची पक्षाची भूमिकाच आपण जाहिर केली होती : एकनाथ खडसे 

सरकारनामा दिवाळी अंक - जाणून घ्या चित्र 2019 चे - येथे क्लिक करा आणि आजच अॅमेझाॅनवर आपला अंक सवलतीच्या दरात घरपोच मिळवा

संबंधित लेख