पुण्याच्या `नीरव मोदी`चा बॅंक ऑफ इंडियाला तब्बल 293 कोटी रूपयांना गंडा

पुण्यातही खोटी पत्रेदाखवून बॅंकेला फसविण्यात आले असून संबंधित व्यक्तिंविरुद्ध मनी लाॅंडरिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रक्कमही तब्बल 293 कोटी रूपये आहे.
पुण्याच्या `नीरव मोदी`चा बॅंक ऑफ इंडियाला तब्बल 293 कोटी रूपयांना गंडा

पुणे : पुण्याच्या `नीरव मोदी`ने तब्बल 293 कोटी रूपयांना बॅंक ऑफ इंडियाला गंडा घातला आहे. श्रीकांत पांडुरंग सवईकर असे या `नीरव मोदी`चे नाव असून, त्याच्या घरावर आणि कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने आज छापे टाकले. 

हिरे व्यापारी नीरव मोदी याने ज्या प्रकारे पंजाब नॅशनल बॅंकेला तब्बल 11 हजार कोटी रूपयांना फसविले; त्याच पद्धतीने श्रीकांत सवईकर याने फसविले असल्याचे समोर आले आहे. वरुण अॅल्यूनियम आणि वरुण ऑटो अशा दोन कंपन्यांद्वारे ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या बाबत पुणे, रत्नागिरी, सांगली आणि नागपूर येथे छापे टाकण्यात आल्याचे संचालनालयाने म्हटले आहे. 

बॅंकांद्वारे देण्यात `लेटर ऑफ क्रेडिट`द्वारे ही फसवणूक झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे. (आमच्या ग्राहकाचा माल विकल्यानंतर तो तुमचे पैसे देईल आणि त्याने पैसे दिले नाही तर ते पैसे आमची बॅंक देईल, अशी गॅरंटी एक बॅंक दुसऱ्या बॅंकेला या `एलसी`द्वारे देते)

बॅंक ऑफ इंडियाच्या कर्वे रस्ता शाखेत सवईकर यांचे खाते होते. त्याने कॅनरा बॅंकेच्या डेक्कन जिमखाना शाखेचे बनावट लेटर ऑफ क्रेडिट तयार करून घेतले. ते `एलसी` बॅंक ऑफ इंडियाच्या कर्वे रस्ता शाखेतील खात्यात वटविले. या `एलसी`च्या आधारे दिलेली रक्कम बॅंक ऑफ इंडियाने कॅनरा बॅंकेकडे मगितली. तेव्हा हे `एलसी` आम्ही दिले नसल्याचे कॅनरा बॅंकेने स्पष्ट केले. तसेच ही बिले सिस्टिममधून `जनरेट` झाली नसल्याचेही कॅनरा बॅंकेने स्पष्ट केले. 

याबाबत सीबीआयकडे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने याची स्वतंत्र चौकशी सुरू करून आज छापे टाकले. तसेच बॅंक ऑफ इंडियाचे काही अधिकारी आणि इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खोट्या `एलसी`च्या आधारे हे 293 कोटी रूपये तातडीने अदा करण्यात आले होते. त्यातून जुनी कर्जे फेडण्यात आली आणि काही रक्कम फिक्स डिपाॅझिटमध्ये ठेवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.  

सवईकर अनेक कंपन्यांवर संचालक असून, त्यात रत्नागिरी मेटल रिसायकलिंग, वरूण शुगर, व्यंकटेश कासटेक, सांगली फोर्जिंग अशी काही कंपन्यांची नावे आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com