दानवे - खडसे यांच्या अचानक भेटीने चर्चेला उधाण

दानवे - खडसे यांच्या अचानक भेटीने चर्चेला उधाण

भोकरदन ः पुण्याच्या भोसरी येथील औद्योगिक भूखंड खरेदी घोटाळ्यामुळे मंत्रिपद गमवावे लागलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात भोकरदन येथील निवासस्थानी रविवारी गुप्त बैठक झाली. विधानसभेत आपल्याच सरकारला अडचणीत आणू पाहणाऱ्या खडसेंनी भोकरदन गाठत थेट दानवे यांचीच भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राज्यात भाजप सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विरोधकांनी रान पेटवलेले असतांना झालेल्या या गुप्त बैठकीत नेमके काय शिजले याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

एकनाथ खडसे यांच्या गाड्यांचा ताफा रविवारी सायंकाळी अचानक रावसाहेब दानवे यांच्या भोकरदनमधील निवासस्थानी समोर येऊन धडकला. खडसे येणार असल्याची कुठलीच माहिती दानवे वगळता जिल्हा, तालुक्‍यातील एकाही पदाधिकारी किंवा भाजप कार्यकर्त्याला नव्हती हे विशेष. दानवे यांच्या घरासमोरील रस्त्याचे काम सुरू असल्याने खडसे यांना आपली गाडी लांब उभी करून पायी चालत जावे लागले आणि तेव्हाच खडसे दानवेंच्या भेटीला आल्याची बातमी फुटली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडसे आणि दानवे यांच्या दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. 
खडसेंनी मांडले गाऱ्हाणे 
दानवे यांच्या भेटीत प्रामुख्याने खडसे यांनी आपल्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप कसे खोटे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करतानाच आपल्याला पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे अशी मागणी केल्याची माहिती आहे. या शिवाय फडणवीस सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असलेला रोष, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरून विरोधकांनी सरकारची केलेली कोंडी या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केल्याचा आरोप करत त्यांच्या विरुद्धच्या तक्रारींचा पाढाच खडसेंनी दानवे यांच्या पुढे वाचल्याचे बोलले जाते. सध्याचे राजकीय वातावरण व राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्‍यता लक्षात घेऊन नेतृत्व बदलावर देखील यावेळी विचारमंथन झाल्याचे सांगितले जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com