DYSP VEHICLE SET ON FIRE IN CHAKAN | Sarkarnama

DYSP राम पठारे यांची उद्या निवृत्ती; चाकणमध्ये आंदोलकांनी त्यांची गाडी जाळली

हरिदास कड
सोमवार, 30 जुलै 2018

नाशिकहून आलेले शिवशाहीतील प्रवासी भयभीत झाल्याने एसटी स्थानकाच्या वरच्या मजल्यावरील खासगी रुग्णालयाचा प्रवाशांनी आसरा घेतला. दुपारी अडकलेले प्रवासी सायंकाळचे साडेसहा वाजले तरी पुण्याला जायची सोय कशी होईल याची वाट पाहत होते. 

चाकण : मराठा सकल मोर्चाच्या आंदोलनास लागलेल्या हिंसक वळणामुळे एसटी आणि शिवशाहीचे प्रचंड नुकसान झाले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या 25 गाड्या जाळण्यात आल्या आणि शिवशाहीच्या दोन गाड्या फोडण्यात आल्या. खेड उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे हे उद्या निवृत्त होणार होते. त्यांची गाडी आंदोलकांनी जाळली.

चाकणमध्ये आजचे हिंसक आंदोलन पोलिसांसाठीही आव्हानात्मक ठरले. सुरवातीला बंदोबस्त कमी असल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. थेट पोलिस ठाण्यावर जमाव चालून गेला होता. आंदोलक टोळक्या टोळक्याने गाड्यांना आग लावत होत्या. याच वेळी बंदोबस्तावर असलेले पठारे यांची गाडी आंदोलकांनी लक्ष्य केली. तळेगाव चौकात त्यांची गाडी उभी होती. महिंद्र कंपनीची झायलो गाडी जमावाने पेटवली. जमाव प्रक्षुब्ध होता. हे पाहून पोलिस तेथून निघून गेले. काठ्या, गज, लोखंडी तलवार घेऊन पोलिस ठाण्यावर हा जमाव चालून गेला. पोलिस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. भयभीत पोलिस आतमध्ये दरवाजा लावून बसल होते. त्यांच्या दरवाजावर आंदोलकांनी लाथा मारल्या. 

पोलिस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, हवालदार अजय भापकर हे जखमी झाले. पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील नंतर दाखल झाले. पोलिसांनी दीडच्या सुमारास आधी अश्रुुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर हवेत गोळीबार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी नंतर जमावबंदीचा आदेश लागू केला. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. 

मराठा मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागेल याची कुणाला कल्पना नव्हती. अचानक झालेल्या हिंसक वळणाची धग नेहमीप्रमाणे एसटीला बसली. स्थानकातील एसटी तसेच महामार्गावरील एसटी जमावाकडून जाळण्यात आल्या. दोन शिवशाही बसच्या काचा फोडल्या. यातील प्रवासी भीतीने गाड्यातून उतरले. गाड्यातून उतरलो खरे, पण अशा परिस्थितीत जायचे कुठे हा प्रश्न सर्व प्रवाशांना पडला.

शिवशाहीतील तसेच एसटीतील साठ ते सत्तर प्रवाशांनी एसटी स्थानकातील वरच्या मजल्यावरील खासगी रुग्णालयाचा आसरा घेतला. वारंवार हिंसक जमाव एसटी स्थानकाच्या आवारात घोषणाबाजी करत फिरत होते. दुपारी एकच्या सुमारास हे प्रवासी अडकून पडले ते सायंकाळी साडेसहा वाजले तरी त्यांची पुण्याला जाण्याची सोय नव्हती.

अखेर शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, रामदास घनवटे, जिल्हा परिषद माजी सदस्य किरण मांजरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेक स्थानिकांनी प्रवासी तसेच कामगार वर्गांना घरी जाण्यासाठी मदत केली. स्वतः आमदार गोरे शहरात फिरून शांततेचे आवाहन करत होते. गोरे यांनी शिवशाहीतील पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र गाडीची सोय केली. मात्र, तरीही विद्यार्थी, कामगार, महिलांना आंदोलनाचा तडाखा बसला. जमावाच्या हिंसक कृत्याची भीती मात्र घरी जाताना सर्वांच्याच मनात होती. 
 

संबंधित लेख