Due to Girish Mahajan BJP Got Stronhold in North Maharashtra | Sarkarnama

महाजनांमुळे भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील महापालिका सत्तेचे वर्तुळ पूर्ण 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 डिसेंबर 2018

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या उत्तर महाराष्ट्रात भाजपचे फारसे स्थान नव्हते. जळगाव जिल्हापरिषदेवर गेल्या पंधरा वर्षापासून असलेली सत्ता हेच पक्षाचे बलस्थान होते. मात्र, गेल्या चार वर्षात भाजपने महापालिका निवडणुकीत मोठा मजल मारली आहे. विशेष म्हणजे या चार महापालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नेतृत्व केले आहे. 

जळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे.राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्याचे खऱ्या अर्थाने हुकमी एक्का ठरले आहेत. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या उत्तर महाराष्ट्रात भाजपचे फारसे स्थान नव्हते. जळगाव जिल्हापरिषदेवर गेल्या पंधरा वर्षापासून असलेली सत्ता हेच पक्षाचे बलस्थान होते. मात्र, गेल्या चार वर्षात भाजपने महापालिका निवडणुकीत मोठा मजल मारली आहे. विशेष म्हणजे या चार महापालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नेतृत्व केले आहे. 

नाशिक महापालिकेपासून त्यांनी श्रीगणेशा केला. नाशिक महापालिकेत भाजपचे फारसे अस्तित्व नव्हते. या ठिकाणी गिरीश महाजन पालकमंत्री होते. भाजप महापालिकेत सत्तेत येईल असे कोणतेही चित्र नव्हते. मात्र, महाजन यांनी भाजपचा झेंडा फडकविणारच अशी घोषणा केली. त्या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी राजकीय डावपेच टाकले अन हुकमी बहुमत मिळवित भाजपचा झेंडा फडकविला. 

जळगाव महापालिकेत तर गेल्या पस्तीस वर्षापासून सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. खडसे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत जैन यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांचा पराभव झाला होता. मात्र त्यावेळीही नगरसेवकांचे बहुमत जैन यांच्या गटाचेच होते. मात्र यावेळी महाजन यांनी भाजपचे नेतृत्व केले. त्यानी निवडणुकीत प्रारंभी जैन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी युती करण्याबाबत सूतोवाच केले. थेट मुख्यमंत्र्यापर्यंत बैठका होवूनही युती काही झालीच नाही. त्यावेळी त्यांनी भाजपतर्फे स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. 'फिफ्टी प्लस'नगरसेवक निवडून आणण्याची हमी दिली. मात्र, त्यावेळची परिस्थिती पाहता भाजपला एवढ्या जागा मिळणार नाही असे वाटत होते. मात्र, महाजन यांनी चाणाक्षपणे तब्बल 57 जागा मिळवून भाजपला हुकमी बहुमत मिळवून दिले. तब्बल 35 वर्षानंतर जैन यांचे पालिकेवरील वर्चस्व संपुष्टात आणले. 

धुळे महापालिका निवडणुकीची स्थिती तर वेगळीच होती. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ.सुभाष भामरे हे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत. अनिल गोटे भाजपचे आमदार आहेत. महापालिकेत भाजपचे केवळ तीनच नगरसेवक होते. अशा स्थितीत निवडणूकीत भाजपची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी दिली. त्याच वेळी पक्षातील आमदार अनिल गोटे यांनी मात्र महाजन यांच्या नेतृत्वाला विरोध केला. परंतू, हा विरोधही मोडीत काढून त्यांनी भाजपचे तब्बल 50 नगरसेवक निवडून एकहाती सत्ता मिळविली. 

नगरपालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांचा प्रचारात फारसा सहभाग नव्हता. मात्र निवडणूका झाल्यावर त्या ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. नगरसेवकाच्या संख्येत भाजप क्रमांक तीनवर होता. त्यामुळे सत्तेचा तिढा कठीण होता. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महाजन यांच्यावरच सत्ता आणण्याची जबाबदारी सोपविली अन त्यांनी आपला राजकीय चाणाक्षपणा पुन्हा सिध्द करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची साथ मिळवित भाजपचा महापौर व उपमहपौर बसवून ही महापालिकाही पक्षाच्या ताब्यात आणली. 

त्यामुळे आजच्या स्थितीत उत्तर महाराष्ट्रातील चारही महापालिका भाजपच्या ताब्यात आल्या असून भाजपचे सत्तेचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. मात्र त्यांचा हुकमी एक्का गिरीश महाजन ठरले असून पक्षातील नव्हेत सरकारमध्येही त्यांचे स्थान वाढले हे मात्र निश्‍चित आगामी काळात पक्ष त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार याकडेच आता लक्ष असणार आहे.
 

संबंधित लेख