dream of mla pacharne`s pa shattered | Sarkarnama

आमदार पाचर्णे यांच्या पीएचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले ! आंबळे येथे सोमनाथ बेंद्रे सरपंच

नितीन बारवकर
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

शिरूर : आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे यांच्या सरपंचपदाच्या उमेदवारीने तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या आंबळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणीत जनसेवा ग्रामविकास पॅनेलने बहुमत मिळविले. सरपंचपदी याच पॅनेलचे सोमनाथ बेंद्रे हे 105 मतांनी निवडून आले. महेश बेंद्रे यांना पराभवाचा धक्का बसला.
 

शिरूर : आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे यांच्या सरपंचपदाच्या उमेदवारीने तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या आंबळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणीत जनसेवा ग्रामविकास पॅनेलने बहुमत मिळविले. सरपंचपदी याच पॅनेलचे सोमनाथ बेंद्रे हे 105 मतांनी निवडून आले. महेश बेंद्रे यांना पराभवाचा धक्का बसला.
 
राष्ट्रवादी प्रणीत जनसेवा व भाजप पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. यात जनसेवा पॅनेलने सरपंचपदासह सहा; तर भैरवनाथ पॅनेलने तीन जागा मिळविल्या. महेश बेंद्रे व सोमनाथ बेंद्रे यांच्यात सरपंचपदासाठी चुरस होती. यात 994 मते मिळवून सोमनाथ बेंद्रे विजयी झाले. महेश बेंद्रे यांना 889 मते मिळाली.

अशोक पवार हे आमदार असताना महेश बेंद्रे हे त्यांचे स्वीय सहायक होते. परंतु मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार यांच्याशी काडीमोड घेऊन ते आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या गोटात आले. विधानसभेला पवार व पाचर्णे यांच्यात झालेल्या संघर्षात बेंद्रे यांनी पाचर्णे यांच्यासाठी जाहीर सभेत भाषणे करून पवारांच्या स्वभावावर व दोषांवर बोट ठेवत टीका केली होती.

तेव्हापासून ते पवार यांच्या "डोक्‍यात' होते. पाचर्णे यांच्या विजयात अनेक घटकांबरोबरच बेंद्रे यांचाही हातभार लागल्याचे बोलले गेले व तेच पुढे पाचर्णे यांचे स्वीय सहायक झाले. आंबळे ग्रामपंचायतीत पाचर्णे व पवार या आजी - माजी आमदारांनी थेट लक्ष घातले नसले; तरी बेंद्रे यांच्या जय - पराजयासाठी काही फासे निश्‍चितच फेकले. बेंद्रे यांच्या विजयासाठी पाचर्णे यांनी; तर पराभवासाठी पवार यांनी आपापल्या समर्थकांत चांगलीच "साखरपेरणी' केली असल्याचेही बोलले जात आहे. 
 

प्रभाग एक मध्ये राजेंद्र झेंडे (380 मते), सुनीता जाधव (377 मते) व जयश्री बेंद्रे (423 मते) हे जनसेवा पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. भैरवनाथ पॅनेलच्या मारूती झेंडे (287 मते), शीतल जाधव (290 मते) व अश्‍विनी बेंद्रे (238 मते) यांचा त्यांनी पराभव केला. प्रभाग दोन मध्ये भैरवनाथ पॅनेलचे शरद निंबाळकर (352 मते), रंजना बेंद्रे (314 मते) व प्रज्ञा श्रीकृष्ण सिन्नरकर (322 मते) यांनी जनसेवा पॅनेलच्या पवन बेंद्रे (255 मते), उषा बेंद्रे (292 मते) व मालन सिन्नरकर (277 मते) यांचा पराभव केला. प्रभाग तीनमध्ये भैरवनाथ पॅनेलच्या मयुर बेंद्रे (304 मते), राहुल धुमाळ (312 मते) व माया बेंद्रे (263 मते) यांना पराभव पत्करावा लागला. तेथे जनसेवा पॅनेलचे प्रदीप ठोंबरे (319 मते), अनिल नरवडे (314 मते) व पूनम बेंद्रे (360 मते) हे विजयी झाले. 

माजी सरपंच अतुल बेंद्रे, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष अण्णा पाटील बेंद्रे, माजी उपसरपंच संताजी बेंद्रे, शहाजी बेंद्रे, बाळासाहेब बेंद्रे, दादा काळे आदींनी जनसेवा पॅनेलचे नेतृत्व केले. आज येथील निवडणूक कचेरीतून निकाल जाहीर होताच जनसेवा पॅनेलच्या समर्थकांनी स्थानिक नेतेमंडळींना व सरपंचपदी निवडून आलेले सोमनाथ बेंद्रे यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. 

संबंधित लेख