सैनीकांच्या कुटुंबियांवर 28 वर्षे मोफत उपचार करणारे डॉ. तुषार शेवाळे

मालेगाव परिसरातील शेकडो सैनिक गावाकडे कुटुंब सोडून सीमेवर कर्तव्य पार पाडतांना निश्‍चिंत असतात. आजी- माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयावंर मोफत उपचार करणारे काँग्रेसचे नेते डॉ. तुषार शेवाळे त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय काळजी घेतात. गेली अठ्ठावीस वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. देशाच्या सीमेवरील जवान त्यांना हक्काने फोन करतात. पुढचे सगळे उपचार डॉ. शेवाळे पार पाडतात. त्यांचा हा उपक्रम कौतुकाचा विषय बनला आहे.
सैनीकांच्या कुटुंबियांवर 28 वर्षे मोफत उपचार करणारे डॉ. तुषार शेवाळे

नाशिक : मालेगाव परिसरातील शेकडो सैनिक गावाकडे कुटुंब सोडून सीमेवर कर्तव्य पार पाडतांना निश्‍चिंत असतात. आजी- माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयावंर मोफत उपचार करणारे काँग्रेसचे नेते डॉ. तुषार शेवाळे त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय काळजी घेतात. गेली अठ्ठावीस वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. देशाच्या सीमेवरील जवान त्यांना हक्काने फोन करतात. पुढचे सगळे उपचार डॉ. शेवाळे पार पाडतात. त्यांचा हा उपक्रम कौतुकाचा विषय बनला आहे.

जम्मु काश्मीरमध्ये शहीद झालेले वायुदलाचे कमांडो खैरनार यांच्या कुटुंबियांना त्यांनी व्यक्तीशः एकवीस हजारांची मदत केली. उत्तर महाराष्ट्रात कोणीही जवान शहीद झाल्यास अजिबात गाजावाजा न करता ते त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करीत आले आहेत.  

देशाच्या ईशान्य सीमेवरील तवांग भागात कर्तव्यावर असलेल्या दरेगाव (ता. मालेगाव) येथील जवानाला सुटी मिळत नव्हती. मुलगा अनेक दिवसांपासून आजारी होता. गावी कुटुंबीय अस्वस्थ, तिकडे जवानही चिंतीत. त्यांनी डॉ. शेवाळे यांना दुरध्वनी करुन याविषयी माहिती दिली व उपचार करण्याची विनंती केली. डॉक्‍टरांनी त्यांना धीर देत निर्धास्त राहण्यास सांगीतले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाची तपासणी केली. त्याच्यावर 'हार्निया'ची शस्त्रक्रिया केली. मुलगा बरा झाल्यावर पुन्हा संबधीत जवानाला त्याची माहितीही दिली. सीमेवर तैनात अशा असंख्य जवानांशी त्यांचा संपर्क होत असतो. गेली अठ्ठावीस वर्षे जवानांचे पत्नी, मुले, आई, वडील अशा सगळ्यांच्या वैद्यकीय तपासणीची काळजी डॉ. शेवाळे वाहतात.

याविषयी माहिती देताना डॉ. शेवाळे म्हणाले, ''मला लष्करात जाण्याची खुप ओढ होती. आठवीपासून मी 'एनसीसी' मध्ये सहभागी झालो. बारावीपर्यंत 'एनसीसी'चे प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 'एनडीए' सहभागी होण्यासाठी परिक्षा दिली. मात्र यशस्वी झालो नाही. त्यामुळे ते वैद्यकीय क्षेत्राकडे वळलो. डॉक्‍टर झाल्यावर ते पुन्हा आर्मर्ड मेडीकल कोअर (एएमसी) जॉईन करायचा प्रयत्न केला. त्यात अडचणी आल्यावर नियमीत काम करतांनाच सैनिकांना मदत करायचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत मी हे काम करीत आहे.''

डाॅ. शेवाळे आजी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय यांची मोफत तपासणी व उपचार करतात. मोठ्या शस्त्रक्रिया असल्यास त्यात निम्मी सवलत देतात. त्यासाठी एक स्वतंत्र कक्षच आहे. सध्या ते मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची सेवाही ते उपलब्ध करतात. सध्याचे सैनिक, माजी सैनिक, हुतात्म्यांचे कुटुंबिय या सगळ्यांना वैद्यकीय साह्य ते करतात.

सैनिक व त्यांचे कुटुंबिय नियमित त्यांच्या संपर्कात असतात. 'केवळ समाधान व सैनिकांविषयी कृतज्ञता म्हणून हे काम करत आलो. त्यातून खुप आनंद मिळतो', असे त्यांनी सांगितले. सैनिक सीमेचे रक्षण करतात. त्यांच्याशी समाजाचे असलेले नाते पाहिले म्हणजे, अनुराधा प्रभुदेसाईंची कविता डोळ्यापुढे तरळुन जाते, 'अझीज बहादुरों, यह बंधन नही, इजहार प्यारका है, प्यार है, और विश्‍वास है'.... हा विश्‍वास सीमेवरच्या सैनिकांना डॉ. शेवाळेंविषयी वाटतो.
 
कोण आहेत डॉ. शेवाळे?

डॉ. तुषार शेवाळे हे अत्यंत सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. त्यांचे बालपण मालेगाव तालुक्‍यात व प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यांचे दुसरे बंधु शासकीय कंत्राटदार आहेत. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. बळीराम हिरे हे त्यांचे मामा होत.  मालेगाव शहरात गेली अठ्ठावीस वर्षे त्यांचे रुग्णालय आहे. काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी विविध संस्थांवर प्रतिनिधीत्व केले आहे. राज्यातील अग्रगण्य व शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक तथा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यामुळे सामाजिक, राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर सध्या ते कार्यरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com