Dr. Subhash Bhamre Challeges NCP Leders to Take Public Meeting | Sarkarnama

हिम्मत असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवावी : डाॅ. सुभाष भामरे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या विरोधात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आव्हान दिले होते. मुख्यमंत्र्यांचा दौराही रद्द झाला. त्यामुळे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आज चांगलेच संतप्त झाले. त्यांनी जाहिर सभेत दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांवर चांगलीच टीका केली. हिम्मत असेल तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भविष्यात सटाणा आणि मालेगाव या माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.

सटाणा :

येथील पाठक मैदानावर पुनंद पाणीपुरवठा योजना, तालुक्‍यातील सिंचन प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. भामरे म्हणाले, "पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तालुक्‍यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांना गेल्या साडेचार वर्षात मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे भरीव निधी मंजुर करण्यात यश आले आहे. आता हे सर्व सिंचन प्रकल्प मार्गी लागत असल्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठला आहे." मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास अपशकून करू पाहणाऱ्यांनी यापुढील काळात त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याची सभा बागलाण व मालेगाव तालुक्‍यात घेऊन पहावी, असा इशाराही डॉ. भामरे यांनी यावेळी विरोधकांना दिला.

कांद्याचे निर्यातमूल्य शून्य करण्यासाठी पंतप्रधानांना निर्णय घेण्यास भाग पाडले व कांद्याला दोनशे रुपये अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. सत्तर वर्षात काँग्रेसने काही केलेले नाही. भाजप शासनाने मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे, असा दावा डाॅ. भामरे यांनी केला. देशाच्या विविध सीमारेषांवर जाऊन सैनिकांशी संवाद साधणारा पहिला संरक्षण राज्यमंत्री असल्याचा अभिमान असल्याचेही डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, माजी आमदार दिलीप बोरसे यावेळी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख