Dr. Jitendra Awhad Challenges BJP | Sarkarnama

आम्ही महात्मा गांधींच्या नावाने मते मागतो तुम्ही गोळवलकरांच्या नावाने मागायची हिंमत दाखवा : डाॅ. जितेंद्र आव्हाड

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 एप्रिल 2019

निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून भाजपचे नेते पाकिस्तान याच एका विषयावर बोलताना दिसत आहेत. यातून भारतातल्या मुस्लिमांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा डाव खेळला जात आहे. ही विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोळवलकर गुरुजींची आहे. भाजपने हिंमत असेल तर थेट गोळवलकरांच्या नावाने मते मागून दाखवावीत, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

अमळनेर : निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून भाजपचे नेते पाकिस्तान याच एका विषयावर बोलताना दिसत आहेत. यातून भारतातल्या मुस्लिमांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा डाव खेळला जात आहे. ही विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोळवलकर गुरुजींची आहे. भाजपने हिंमत असेल तर थेट गोळवलकरांच्या नावाने मते मागून दाखवावीत, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

अमळनेर, चाळीसगाव आदी ठिकाणी डाॅ. आव्हाड यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा झाल्या. त्यात त्यांनी मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला चढवला. भाजपची विचारसरणी ही संघाचीच विचारसरणी आहे, हा मुद्दा आव्हाड यांनी या सभांमधून मांडला. ते म्हणाले, ''पाकिस्तानचा बागुलबुवा दाखवून मते मागणारे मोदी हे स्वतंत्र भारतातले पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या भाषणात विकासाचे मुद्दे सोडून सर्वकाही आहे. गोळवलकर गुरुजी यांनी जी विचारसरणी मांडली तिच विचारसरणी संघ आणि भाजपचे दुहेरी सदस्य असलेले मोदी, गडकरी, साक्षीमहाराज मांडत आहेत."

डाॅ. आव्हाड पुढे म्हणाले, "गोळवलकरांनी १९४२ च्या लढ्याला विरोध केला होता. इंग्रज देश सोडून जातील पण भारत स्वातंत्र्यासाठी तयार नाही, अशी त्यांची विचारसरणी होती. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीलाही त्यांनी विरोध केला होता. कारण मनूस्मृती हीच जगमान्य, असा त्यांचा दूराग्रह होता. भारताच्या तिरंग्यालाही गोळवलकरांचा विरोध होता. कारण तीन अशुभ आहे, ही त्यांची अंधश्रद्धा होती. हे मी सांगत नाही तर संघाचे विचारपत्र द आॅर्गनायझरमध्ये हे सगळे प्रसिद्ध झालेले आहे. गोळवलकरांच्या साहित्यातून मनुस्मृतीचे उघड समर्थन व वंचितांचा द्वेश उघडपणे दिसतो. त्यामुळे आम्ही गांधींच्या नावाने मते मागतो, तुम्ही गोळवलकरांच्या नावाने मागायची हिंमत दाखवा."

"भाजपच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये महिला सक्षमीकरण, दलित-आदिवासी मागासवर्गियांचे प्रश्न यांचा साधा उल्लेखही नसतो. केवळ पाकिस्तान, बालाकोट सर्जिकल स्ट्राईक यांचे दाखले देत हे नेते भारतीय मुस्लिमांच्या मनात भिती निर्माण करत आहेत. आम्ही शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारसरणी पुढे न्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आमच्या भाषणांत त्यांच्या उल्लेख आवर्जुन असतो. भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे. या देशाला महात्मा गांधी हवेत की गोळवलकर हे लोकांनीच ठरवायचे आहे." असेही डाॅ. आव्हाड म्हणाले. 

संबंधित लेख