dr borase in dhule | Sarkarnama

शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. माधुरी बोरसे भाजपमध्ये

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

धुळे : शिव आरोग्यसेनेच्या प्रदेशाध्यक्षा आणि सहसंपर्कप्रमुख कॅन्सरतज्ञ डॉ. माधुरी बोरसे -बाफना यांनी अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला आज मोठा धक्का दिला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजपने धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांमधील प्रमुख पदाधिकारी, नेत्यांचे प्रवेश करून घेत बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. तो चर्चेचा विषय ठरत आहे. 

धुळे : शिव आरोग्यसेनेच्या प्रदेशाध्यक्षा आणि सहसंपर्कप्रमुख कॅन्सरतज्ञ डॉ. माधुरी बोरसे -बाफना यांनी अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला आज मोठा धक्का दिला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजपने धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांमधील प्रमुख पदाधिकारी, नेत्यांचे प्रवेश करून घेत बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. तो चर्चेचा विषय ठरत आहे. 

कॉंग्रेसच्या माजी आरोग्य मंत्री डॉ. शालिनीताई बोरसे यांचा राजकीय वारसा डॉ. माधुरी सांभाळत आहेत. त्यांच्यासह पती डॉ. विपुल बाफना कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते. नंतर त्यांनी मुंबईत 2 सप्टेंबर 2014 ला शिवसेनेत प्रवेश केला. सामाजिक, राजकीय आणि आरोग्य क्षेत्रात चिकाटीसह जोमाने कार्य करणाऱ्या डॉ. बोरसे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि पर्यटन, रोहयो मंत्री जयकुमार रावल यांचे वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते. तो योग आज जुळून आल्याचे मानले जाते. 

खिंडार पाडण्यात यश 
जिल्ह्यासह धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संघटन बळकट करणे आणि आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत इतर पक्षातील कार्यशील, चांगला जनसंपर्क असलेले पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी मंत्रीव्दयींसह भाजपचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल प्रयत्नशील आहेत. त्यात त्यांनी चांगले यश मिळविल्याचा अनेक कार्यकर्त्यांमध्ये सूर आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला खिंडार पाडत भाजपच्या या नेत्यांनी अनेकांचे आपल्या पक्षात प्रवेश करून घेतले आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. बोरसे यांचाही प्रवेश झाल्याने त्यांचे अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. 

भाजप कार्यालयात सोहळा 
भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, पर्यटन मंत्री रावल, शहराध्यक्ष अग्रवाल, माजी शहराध्यक्ष हिरामण गवळी, भिकन वराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बोरसे, डॉ. बाफना यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या मान्यवरांनीही डॉ. बोरसे, डॉ. बाफना यांचे स्वागत केले. डॉक्‍टर सेलचे डॉ. संदीप पाटील, सुनील पाटील, नीलेश राजपूत, अनिल चौधरी, दिनेश शिनकर उपस्थित होते. 

संघटन, संपर्कावर भर 
डॉ. बोरसे यांचा शिवसेनेच्या सर्व गटांशी चांगला समन्वय राहिला. शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांनी राज्यातील हजारो डॉक्‍टरांचे संघटन उभारले. वैद्यकीय व्यवसायाबरोबर सामाजिक कामात त्या अग्रेसर आहेत. पाच वर्षांपासून जीवनदायी योजनेत राज्यात उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी त्यांच्या रूग्णालयीन सेवेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. शहरातील काही अनुचित घटनांवेळी दोन्ही गटांमधील रुग्णांना मोफत उपचार करून डॉ. बोरसे यांनी जातीय सलोखा राखण्यास पुढाकार घेतला आहे. 

डॉ. बोरसे यांची भूमिका 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, पर्यटन मंत्री रावल यांच्या प्रेरणेने भाजपमध्ये प्रवेश केला. वर्षभरापासून ही चर्चा सुरू होती. तिला पूर्णविराम मिळाला. शिवसेनेसह पक्षप्रमुखांनी मान दिला, सामान्य शिवसैनिकांनी सन्मान केला, सर्व आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी धाकटी बहीण मानून मार्गदर्शन केले. त्यांच्या ऋणात राहील, अशी भूमिका डॉ. बोरसे यांनी भाजप प्रवेशानंतर मांडली. 

 

संबंधित लेख