Dr Ajit Navle Journey from farmer's strike to red march | Sarkarnama

डॉ. अजित नवले : शेतकरी संपातुन शिकले; रेड मार्चमध्ये जिंकले !

संपत देवगिरे : सरकारनामा 
मंगळवार, 13 मार्च 2018

किसान सभेतर्फे चाळीस हजार शेतकऱ्यांनी लाल बावटा घेऊन नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढला. यातील बहुतांशी मागण्या शासनाने लिखीत स्वरुपात मंजुर केल्या. गेल्या काही वर्षातील हे पहिले यशस्वी आंदोलन म्हणून देशभर चर्चेत आहे. विविध नेते त्याच्या अग्रभागी होते. मात्र चर्चेत राहिलेला कार्यकर्ता, सरकारला सलणारा व प्रसंगी टार्गेटवर असलेला , माध्यमांचा आयकॉन म्हणजे डॉ. अजित नवले !

नासिक : किसान सभेतर्फे चाळीस हजार शेतकऱ्यांनी लाल बावटा घेऊन नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढला. यातील बहुतांशी मागण्या शासनाने लिखीत स्वरुपात मंजुर केल्या. गेल्या काही वर्षातील हे पहिले यशस्वी आंदोलन म्हणून देशभर चर्चेत आहे. विविध नेते त्याच्या अग्रभागी होते. मात्र चर्चेत राहिलेला कार्यकर्ता, सरकारला सलणारा व प्रसंगी टार्गेटवर असलेला , माध्यमांचा आयकॉन म्हणजे डॉ. अजित नवले.

हे सर्व घडले कसे?. त्याच्या मुळाशी काय?. त्यातील प्रश्‍नांची लांबलचक यादीच आहे. मात्र ढोबळपणे पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण यांसह जव्हार, शहापुर, डहाणु आदी राज्यभरातील आदिवासी व शेतकऱ्यांची स्थिती त्याच्या मुळाशी आहे. ती म्हणजे, शासन निर्णय होऊनही पदरात काही पडले नाही. कायदा होऊनही वनजमीन मिळाली नाही.

डोळ्यासमोरचे हक्काचे पाणी मृगजळ ठरले. कर्ज कमी होईना अन्‌ बॅंका दारात उभ्या करेनात ही होय. यासंदर्भात 15 फेब्रुवारीला सांगलीला किसान सभेची बैठक झाली. त्यावर चर्चा होऊन 6 मार्चला लॉंग मार्च काढण्याचा निर्णय झाला. अवघ्या वीस दिवसात तो यशस्वी झाला. यामागे मार्क्सवादी  कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना व किसान सभेचे केडर आहे.

डॉ. नवले मुळचे नगरच्या नवलेवाडी (ता. अकोला) येथील. वडिल संगमनेर कारखान्यात नोकरीला. आई शेती करणारी. त्यात यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात व वैद्यकीय शिक्षण पुण्यात झाले. पत्नी डॉ. अर्चना प्रसुतिगृह चालवते. अशी त्यांची सामान्य पार्श्‍वभूमी आहे. मात्र स्वातंत्र्य चळवळीत या गावातील सर्व पुरुष कारागृहात होते. महिलांनी सहा महिने गावगाडा चालवला. कॉम्रेड देशमुख यांच्यामुळे सबंध गावावर कम्युनिस्टांचा प्रभाव. त्यातुन शालेय वयात त्यांनी स्टुडंट फेडरेशनच्या संपर्कात येऊन डाव्या चळवळीत सक्रीय झाले. सध्या ते किसान सभेचे सरचिटणीस आहेत. 

यातुन वैचारिक पाया भक्कम झाला. त्यामुळे राज्यात शेतकरी संप झाला तेव्हा सुकाणू   समितीत ते सदस्य  होते. त्यावेळी  सरकारने समितीला गुंडाळले. मध्यरात्री चर्चा करुन राजकीय नेत्यांच्या मदतीने संप फोडला. त्याला दाद न देता बैठकीतुन बाहेर पडत विरोध करणारे एकमेव सदस्य म्हणुन डॉ. नवले एका रात्रीत हिरो झाले होते.

त्यात काय काय घडले, काय, कोणाचे, कुठे चुकले हा अनुभव गाठीशी असल्याने त्याचा लॉंग मार्च आंदोलनात त्यांना खुप फायदा झाला. संघटनेचे नेते डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित व अन्य  नेत्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अजित नवले यशस्वी झाले.

गेल्या आठवडाभर त्यांचे अहोरात्र परिश्रम सुरु होते. रविवारी व सोमवारी सलग दोन दिवस झोपच नव्हती. काल सायंकाळपासून त्यांचा फोन सारखा घणघणत आहे. कोणा कोणाचे, काय-काय बोलणे सुरु असते. ते न थकता सगळ्यांशी बोलतात. अभिनंदन अन्‌ शुभेच्छा स्विकारतात.

राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी पोळले आहे. त्यामुळे अन्यायाविरुध्द आत्महत्त्या  नव्हे तर व्यवस्थेविरोधात संघर्ष हाच एकमेव मार्ग आहे ही डॉ. नवलेंचे पक्की बैठक आहे. या स्थितीत नियोजन करतांना सुरवातीला दोन दिवस अडचणी आल्या. शेतकरी आपल्यासोबत भात घेऊन आले होते. ते शिजवण्याची व पिण्याचे पाणी ही सोय महत्वाची होती. त्यात मुंबई ढाबा आणि घाटात अडचणी आल्याने मुक्कामीाच ठिकाणे बदलावी लागली. मात्र मुंबईत प्रवेश केल्यावर हे आंदोलन शेतकऱ्यांचे नव्हे तर नाहीरे वर्ग व समाजाच्या उपेक्षीत शेतकऱ्यांचे बनले . 

 माणुसकी म्हणुन अनेक शेतकरी मुले पुढे येऊन आंदोलकांचे स्वागत व व्यवस्था करीत होते. पाणी, जेवण , अल्पोपहार देत होते. शेतकरी कामगार पक्ष, मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि अनेकांनी त्यांना पाठींबा दिला. शेतकरीही शांततेत व कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेत मार्च करतील यावर नवलेंच्या नियोजनाचा भर होता.

एक वेळ अशी आली की, 'सरकार नवलेंना टाळतेय' अशा बातम्या आल्या. मात्र किसान सभा व त्यांचे सर्व नेते ठाम राहिल्याने डॉ. नवले चर्चेतील एक महत्वाचा घटक ठरले. 'शेतकरी संपात सुकाणू  समितीच्या अनुभवातुन शिकले ते येथे कामाला आले. मैदानावरचे अन्‌ मुख्यमंत्र्यांशी टेबलवरच्या चर्चेत दोन्हींत किसान सभा जिंकली.' अशी डॉ. नवलेंची प्रतिक्रीया होती.
 

संबंधित लेख