Don't worry , everything will be all right , he assured me | Sarkarnama

काळजी करू नको, सगळ व्यवस्थित होईल, असा धीर त्यांनी दिला

जगदीश पानसरे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

1 फेब्रुवारीला वडीलांचे निधन झाले आणि पाच फेब्रुवारीला  माझी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी नियुक्ती केली. 10 हजार कोटी रुपये बजेट असणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजार समितीचा वयाच्या पंचवीसाव्या वर्षी संचालक होण्याचा मान मला त्यांच्यामुळेच मिळाला.

औरंगाबादः स्व. विलासराव देशमुख हे नेहमीच कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे. पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता, त्याच्या कुटुंबाला त्यांनी कधी वाऱ्यावर सोडले नाही.

वडीलांचे अचानक ह्दयविकाराने निधन झाले. मी कुटुंबात सगळ्यात मोठा होतो. 24-25 वर्षांचा असतांना आधार गमावला आता पुढे काय करायचे हा प्रश्‍न होता, पण विलासरावांनी पाठीवर हात ठेवत धीर दिला आणि पंचवीसाव्या वर्षी मी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक झालो, अशी आठवण कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य जितेंद्र देहाडे यांनी सरकारनामीशी बोलतांना सांगितली. 

माझे वडील अंकुशराव देहाडे साहेबांचे अत्यंत विश्‍वासू कार्यकर्ते होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असतांना वडील परदेश दौऱ्यावर गेले आणि त्यांना दुबईत ह्दयविकाराचा झटका आला. आम्हाला याबद्दल काहीच माहित नव्हते. जेव्हा कळाले तेव्हा काय करावे सुचेना. मी विलासरावांना फोन केला आणि त्यांना झाला प्रकार सांगितला. 

"काळजी करू नको, सगळ व्यवस्थीत होईल'' असा धीर त्यांनी दिला. पासपोर्ट घेऊन ये असा निरोप दिला आणि दुबईला जाण्यासाठीचा व्हिसा तयार करून मला तातडीने वडलांजवळ दुबईला पाठवले. रोज रात्री वडीलांची प्रकृती कशी आहे? तुला काही अडचण आहे का? हे विचारण्यासाठी त्यांचा मला फोन यायचा. वडीलांच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती, ते कोमात गेल्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्याची इच्छा मी व्यक्त केली. पण विमाने पेशंट मुंबईला घेऊन जाण्याची परवानगी दुबईत मिळाली नाही. 

ही अडचण समजल्यावर विलासरावांनी पुन्हा मला धीर देत स्वतंत्र एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि वडलांना मुंबईला हलवले. तिथेही त्यांनी स्वतः येऊन बाबांच्या प्रकृतीची चौकशी केली, काय हव नको ते विचारले. अनेक प्रयत्नानंतरही वडीलांचे निधन झाले. 

पीएचडीचे शिक्षण अपुर्ण होते. पुढे काय करावे हा प्रश्‍न माझ्या समोर होता. मी साहेबांना मनाची घालमेल बोलून दाखवली. त्यांनी मला राजकारण येण्याचा सल्ला दिला. पण लहानपणापासून वडीलांनी मला राजकारणापासून दूर ठवले होते. मला जमेल का? असा प्रश्‍न होता पण तू सुशिक्षित आहे तुझ्या सारख्या तरूणाची राजकारणात गरज असल्याचे विलासरावांनी सांगितले आणि माझा राजकारणात प्रवेश झाला. 

1 फेब्रुवारीला वडीलांचे निधन झाले आणि पाच फेब्रुवारीला विलासराव देशमुखांनी माझी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी नियुक्ती केली. 10 हजार कोटी रुपये बजेट असणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजार समितीचा वयाच्या पंचवीसाव्या वर्षी संचालक होण्याचा मान मला त्यांच्यामुळेच मिळाला. पुढे दहा वर्ष या पदावर काम करण्याची त्यांनी मला संधी दिली.

संबंधित लेख