dont take maratha youth to ayodhya : seva sangh | Sarkarnama

आरक्षण महत्त्वाचे! मराठा खासदारांनी मराठा तरुणांना अयोध्येला नेऊ नये : सेवा संघ

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे येत्या २४ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसेना नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र या मंदिराच्या प्रश्नापेक्षा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असा सल्ला देत मराठा सेवा संघाने ठाकरे यांच्या अयोध्यावारीला विरोध दर्शवला आहे.

पुणे : राज्यात मराठा आरणक्षाचा लढा जोमात असताना दुसरीकडे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मराठा पोरांना घेऊन अयोध्येतील राममंदिरासाठी घेऊन निघाले आहेत. मराठा आरक्षण महत्त्वाचे की अयोध्येचे राम मंदिर, असा सवाल मराठा सेवा संघाने विचारला आहे. मराठा तरुणांनी याचा विचार करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाने केले आहे.

मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव कमलेश पाटील यांनी याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात हा सवाल विचारला आहे. मराठा खासदारांनीही हा विषय समजून घ्यायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

वैश्य खासदार वैश्य समाज पोरांना अयोध्येला नेत नाहीत किंवा तीर्थाटन करत नाही. हे खासदार वैष्णव देवी यात्रेसाठी ट्रेन भरून नेत नाहीत. जैन खासदार हे त्यांच्या समाजातील तरुणांना अयोध्येला नेत नाहीत. ब्राह्मण समाजातील नेते हे त्यांच्या मुलांना अयोध्येला नेत नाहीत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. 

``याउलट मराठा लोक प्रतिनिधींची अवस्था आहे.  मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी ४२ जणांनी आत्महत्या केल्या तरी शासनातील मराठ्यांकडून हुंकार बाहेर पडला नाही. याला अपवाद केवळ छत्रपती उदयराजे भोसले यांचा आहे., असे सेवा संघाने म्हटले आहे.

मंडल आयोगाच्या वेळी माळी, वंजारी, तेली वगैरे बांधवांनी ओबीसी आरक्षण मिळवून घेतले. तेव्हा आमचे मराठे हिंदुहृदयसम्राटांच्या सांगण्यावरून अयोध्येला मशीद पाडायला गेले होते. ती वेळ टळली. त्यामुळे मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्याचे राहून गेले. आता मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर आशा निर्माण झाली आहे. याच वेळी हिंदुहृदयसम्राटांचा पुत्र पुन्हा मराठ्यांना अयोध्येला घेऊन चालला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर पोरे शिकतील. नोकरीला लागतील.  खळखट्याक करून यांचं राजकारण कोण टिकवणार, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी अयोध्येला जायचं की आरक्षणासाठी लढायचं, याचा विचार करावा,`` असे आवाहन त्यांनी केले. 

संबंधित लेख