प्रचार संपल्यानंतर शरद पवारांना बारामती मतदारसंघात थांबण्यास मनाई करा : स्थानिक भाजपची मागणी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह ज्यांचे मतदान बारामती मतदारसंघात नाही, त्यांना प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदारसंघात थांबण्याची मनाई करावी, अशी मागणी स्थानिक भाजपच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडली जावी या साठी भाजपच्या वतीने आज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे विविध मागण्यांची पत्रे सादर करण्यात आली.
प्रचार संपल्यानंतर शरद पवारांना बारामती मतदारसंघात थांबण्यास मनाई करा : स्थानिक भाजपची मागणी

बारामती शहर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह ज्यांचे मतदान बारामती मतदारसंघात नाही, त्यांना प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदारसंघात थांबण्याची मनाई करावी, अशी मागणी स्थानिक भाजपच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडली जावी या साठी भाजपच्या वतीने आज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे विविध मागण्यांची पत्रे सादर करण्यात आली. भाजपचे प्रशांत नाना सातव यांनी ही मागणी केली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली. या वेळी सुरेंद्र जेवरे, सतीश फाळके, कायदेशीर सल्लागार विक्रम देशमुख, जहीर पठाण उपस्थित होते. निवडणुकीच्या कामात रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, शारदा प्रतिष्ठान, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सहभागी करुन घेऊ नये, असे पत्रात सातव यांनी नमूद केले आहे. या संस्था राष्ट्रवादीशी संबंधित नेत्यांच्या ताब्यात असून त्यांच्या राजकीय वलयाचा परिणाम निवडणूक प्रक्रीयेवर होण्याची शक्यता असल्याने या कर्मचा-यांना या प्रक्रीयेपासून दूर ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दुसरीकडे गेल्या निवडणूकीत ज्या मतदान केंद्रावर एकाच उमेदवाराला ७५ टक्क्यांहून अधिक मतदान मिळाले, अशी मतदानकेंद्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संवेदनशील म्हणून जाहीर करावीत व तेथे आचारसंहिता व मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यात पणदरे, माळेगाव, नीरावागज, मेखळी, डोर्लेवाडी, गुनवडी, पिंपळी, कण्हेरी, मळद, लिमटेक, काटेवाडी या सारख्या मतदान केंद्राचा समावेश आहे.

दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह ज्यांचे मतदान बारामती लोकसभा मतदारसंघात नाही, त्यांना प्रचाराची मुदत संपल्यावर मतदारसंघात थांबण्यास मनाई करण्यात यावी, त्यांचा प्रभाव निवडणूक प्रक्रीयेवर जाहीर प्रचाराची वेळ संपल्यानंतर पडणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी, असे नमुद केले आहे.

या शिवाय मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मतदारांव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मज्जाव करावा, पोलिस यंत्रणा राष्ट्रवादीच्या दबावाखाली असून प्रत्येक मतदान केंद्रावर निरिक्षक नेमून कॅमेरे बसवावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणांचीही बारकाईने तपासणी होऊन त्यात जर त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असल्यास त्यांच्यावरही कारवाई व्हावी, असेही पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com