Dombivlli Crematorium | Sarkarnama

सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत रस्त्यावरच अंत्यविधी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जून 2017

डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा प्रभागात मॉडेल रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात आजही रस्त्यालगत अंत्यविधी केले जात आहेत. ज्या ठिकाणी अंत्यविधी केले जातात त्या ठिकाणी रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र, अंत्यविधीची जागा सोडून रस्त्याचे काम सुरू आहे.

डोंबिवली - एकाबाजूला कल्याण डोंबिवली शहरात स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवली जात असताना दुसरीकडे या सांस्कृतिक नगरीत सुसज्ज अशी स्मशानभूमी नसल्याने रस्त्यालगतच उघड्यावर मृतदेहांवर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे. नवीन स्मशानभूमी बनविण्याबाबत केवळ कागदी घोडे नाचविले जात असून स्थानिक नगरसेवकही यात कमी पडत असल्याची चर्चा डोंबिवलीकरांमध्ये रंगली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा प्रभागात मॉडेल रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात आजही रस्त्यालगत अंत्यविधी केले जात आहेत. ज्या ठिकाणी अंत्यविधी केले जातात त्या ठिकाणी रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र, अंत्यविधीची जागा सोडून रस्त्याचे काम सुरू आहे. दिवगंत नगरसेवक शिवाजी शेलार यांनी या समस्येकडे लक्ष दिले होते. पूर्वी हा रस्ता नव्हता. मात्र, या परिसराचा विकास झाला तेव्हा ही स्मशानभूमी उघड्यावर आली.

आता या प्रभागाचे नगरसेवक भाजपाचे साई शेलार आहेत. या समस्येबाबत स्थानिक नगरसेवकाने पालिकेकडे पाठपुरावा करण्यास प्रारंभ केला आहे मात्र, पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे भाजपा पदाधिकारी राजू शेख यांनी सांगितले. तर स्थानिक नगरसेवक साई शेलार यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

खंबाळपाडा  परिसराचा दिवसेंदिवस विकास होत असून याठिकाणी अनेक नव्या इमारती उभ्या राहत आहेत. केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे त्या भाजपाच्या नगरसेवकाच्या प्रभागातच रस्त्यालगत अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने स्मार्ट सिटीच्या भुलथापांचे पितळ उघडे पडले आहे.

संबंधित लेख