Dombivali news - Narayan Rane slams Shivsena | Sarkarnama

शिवसेनेत आता दलाल आणि व्यावसायिकांचा सुळसुळाट : नारायण राणे 

मयुरी चव्हाण काकडे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

"आपण वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेचे सदस्य झालो. आता शिवसेनेत सर्व दलाल आणि व्यावसायिकांचा भरणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आक्रमक माणसे आवडायची. हे मेंगळट उद्धव ठाकरेला काय कळणार,' असा सवाल उपस्थित करून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. 

डोंबिवली : "आपण वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेचे सदस्य झालो. आता शिवसेनेत सर्व दलाल आणि व्यावसायिकांचा भरणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आक्रमक माणसे आवडायची. हे मेंगळट उद्धव ठाकरेला काय कळणार,' असा सवाल उपस्थित करून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. 

डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना येथे शाहू सावंत प्रतिष्ठानच्या वतीने नारायण राणे यांच्या समर्थनार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यावर राणे डोंबिवलीत पहिल्यांदा जाहीरपणे बोलले. या वेळी कोकणवासीयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या वेळी नारायण राणे यांनी उद्धव यांच्यावर कडवट टीका केली. 

आम्ही सेनेत असताना त्यावेळेला जे काम केले आहे, त्या बळावर आज उद्धव ठाकरे शिवसेना चालवत आहेत. बाळासाहेबांची मराठी माणसासाठी असणारी तळमळ पाहून आम्ही त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला, असे राणे म्हणाले. 

राणे भाजपात जाऊन मंत्री व्हायला नको, याकडेच उद्धव ठाकरेंचे अधिक लक्ष आहे. त्यांना माझे चांगले पाहवत नाही. काय अवस्था झालीय त्या शिवसेनेची? अशी खरपूस टीका करत त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले. सत्तेत राहून फायदे घ्यायचे. मंत्री आहेत आणि सरकारविरोधात आंदोलन करायचे. यामुळे शिवसेनेवर लोकं हसत आहेत. आपण कोणाचे मंगळसूत्र गळ्यात घातले आहे हेच उद्धवला कळत नाही. स्वतःचा विकास करता-करता या पक्षाची काय वाईट अवस्था झाली आहे, अशा कडवट शब्दांत त्यांनी शिवसेनेवर तोफ डागली. 

जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. त्याचेच हे प्रयोजन आहे असे समजल्यास चुकीचे ठरणार नाही असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले. येत्या 1 ऑक्‍टोबरला आपण दुपारी 1 वाजता आपली पुढची दिशा ठरवणार आणि जाहीर करणार, असे राणे यांनी सांगितले. डोंबिवलीत जास्त कोकणी बांधव राहतात. तुम्ही साथ किती देताल ते माहिती नाही; मात्र तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे नारायण राणे म्हणाले. 

म्हणून शिवसेना सोडली 
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जेवढा त्रास दिला, तेवढे कोणीच दिला नसेल. माझे उद्धव ठाकरेंसोबत कधीच पटत नव्हते. ते माझ्या प्रत्येक कामात व्यात्याय आणायचे. माझ्यामुळे वडील आणि मुलात भांडणे नको म्हणून मी केवळ उद्धवच्या त्रासाला कंटाळूनच शिवसेना सोडली. कुठल्याच मुलाने उद्धव इतका त्रास आपल्या वडिलांना दिला नसेल. 

मिडियावरही टीका 
टीव्हीचा टीआरपी आणि पेपरचा खप वाढवण्यासाठी गेले काही महिने बातम्यांमध्ये फक्त नारायण राणेच दिसत आहेत. जी वाक्‍य मी बोललो नाही, ते दाखवले जात आहे. गेली 50 वर्षांत आपण एकही चांगले काम केले नाही का? असा प्रश्न त्यांनी मीडियाला उद्देशून केला. जे चुकीचे वागत आहेत त्यांच्याबद्दल काही दाखवत नाही. केवळ मी काही केले की लगेच बातमी होते. 

संबंधित लेख