dog in pmc hall | Sarkarnama

पुणे महापालिकेच्या नव्या, देखण्या सभागृहातच मोकाट कुत्रे

ज्ञानेश सावंत
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

पुणे : पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दिमाखात उदघाटन करून चार महिन्यांचा कालावधी संपला; पण, नव्या इमारतीत बसण्याची संधी पदाधिकाऱ्यांना मिळालेली नसतानाच येथील एका सभागृहात मोकाट कुत्रा शिरल्याचे उघडकीस आले.

एवढेच नव्हे पाहुण्यांकरिता मांडलेल्या खुर्च्चात कुत्रा झोपल्याचे आढळून आले. त्यामुळे इमारतीच्या अर्धवट बांधकामासोबतच आता तिच्या सुरक्षा व्यवस्थेकडेही बोट दाखविले जात आहे. उदघाटनाच्या कार्यक्रमापासून इमारतीच्या मागे लागलेली संकटांची मालिका अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. 

विशेष म्हणजे, या इमारतीच्या आवरासह बहुतांशी अधिकाऱ्यांची नियोजित केबिन आणि सभागृहांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. इमारतीत कुत्र्यांचा फिरत असल्याच्या घटनेची महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. सुरक्षा रक्षकांना जाब विचारण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास सर्वत्र नागरिकांना होत आहे. त्याबद्दल अनेक तक्रारी करण्यात येतात. आता पालिकेच्या सभागृहातच कुत्रे शिरल्याने पालिकेच्या कारभारावर प्रकाश पडला आहे.
 
या इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपराष्ट्रपती वंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात इमारतीच्या छतातून पाण्याची गळती झाली. तेव्हाच, इमारतीचे काम अर्धवट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुद्दयावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. या घटनेची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांनी चौकशीही केली. इमारत वापरण्याजोगी असली तरी, उपाययोजना कराव्या लागतील, असा अहवाल समितीने दिला आहे.

इमारतीचे अर्धवट काम आणि आता त्यात कुत्र्यांचा वावर वाढल्याने महापालिकेच्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका दालनात कुत्रा झोपल्याचे निदर्शनास आले. तसे फोटो "व्हायरल' झाल्याने त्याची चर्चा सुरू आहे. तेव्हाच, या मुद्दयावरूनही विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले आहे. महापालिकेची मिळकत या सांभाळता येत नाही. ज्यामुळे कुत्रे फिरत आहेत, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

संबंधित लेख