Does Rane get response in Pune? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राणेंच्या "स्वाभिमान'चा झेंडा पुण्यात फडकणार? 

उमेश घोंगडे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांच्या नव्या पक्षात पुण्यातून कितपत प्रतिसाद मिळेल, याची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शहरात त्यांचे काही समर्थक आहेत. कोणताही मोठा नेता "स्वाभिमान'मध्ये जाण्याची शक्‍यता कमी आहे. स्वाभिमानी संघटनेच्या फळीवर नव्या पक्षाची सूत्रे मात्र येऊ शकतात. 

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांच्या नव्या पक्षात पुण्यातून कितपत प्रतिसाद मिळेल, याची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शहरात त्यांचे काही समर्थक आहेत. कोणताही मोठा नेता "स्वाभिमान'मध्ये जाण्याची शक्‍यता कमी आहे. स्वाभिमानी संघटनेच्या फळीवर नव्या पक्षाची सूत्रे मात्र येऊ शकतात. 

माजी आमदार आणि शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, नीतेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन सातपुते, विद्या सहकारी बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर हे राणे यांचे पुण्यातील समर्थक आहेत. त्यातील अनास्कर हे तर पक्ष संघटनेची घोषणा झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांच्या शेजारीच बसले होते. सातपुते हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांनी खराडीतून भाजपकडून महापालिका निवडणूकही लढविली होती. अनास्कर हे राणे यांचे मित्र म्हणून पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ते थेट संघटनेत सक्रिय भूमिका बजावण्याची शक्‍यता कमीच आहे. सचिन सातपुते हे राणेंचे कट्टर आहेत. 

शिवसेना सोडल्यानंतर राणे यांच्यावर "सामना'ने प्रचंड टीका केली होती. त्यानंतर "सामना'चे पुण्यातील कार्यालय फोडण्याबद्दल सातपुते यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. हे सातपुते पुन्हा भाजपमधून स्वाभिमानमध्ये येण्याची शक्‍यता आहे. याबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सोडणार का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""दादांसाठी तेवढे करावे लागेल.'' त्यामुळे सातपुते यांच्याकडे पुण्यातील स्वाभिमान पक्षाची धुरा येऊ शकते. मनसेचे पुण्यातील काही कार्यकर्ते "स्वाभिमान'मध्ये येण्यास उत्सुक असल्याचेही सातपुते यांनी सांगितले. 

राणे यांच्याबरोबर शिवसेना सोडणारांमध्ये निम्हण यांचा वरचा क्रमांक होता. ते राणे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जात. शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर निम्हण शिवाजीनगर मतदारसंघातून आमदारदेखील झाले. मात्र त्यानंतर राणे यांना सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत शहराध्यक्षपद मिळविले. महापालिकेची निवडणूक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने लढवली. मात्र सेनेला अपेक्षित यश मिळविता आले नाही. गेल्या काही महिन्यांपासून ते सेनेतही अस्वस्थ असल्याची चर्चा होती. त्यांनी शहराध्यक्षपद सोडण्याची तयारी केल्याची चर्चा होती. 

या साऱ्या पार्श्‍वभमूीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "" व्यावसायिक कारणामुळे शहराध्यक्षपदासाठी वेळ देणे शक्‍य नाही. त्यामुळे हे पद सोडण्याची इच्छा काही महिन्यांपूर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. नवीन शहराध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत मी या पदावर काम करणार आहे. त्यानंतर एक शिवसैनिक या नात्याने तितक्‍याच तडफेने पक्षाचे काम करणार आहे. त्यामुळे शिवसेना सोडून इतरत्र कुठे जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. तसा विचारही माझ्या मनात नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा होण्याचे कारणदेखील नाही.''  

संबंधित लेख